SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

तुमची 10 लाखांची FD असलेली बँक बुडाली तर किती पैसे परत मिळणार? जाणून घ्या नियम

डीआयसीजीसीचे ₹5 लाख संरक्षण हे प्रत्येक बँकेतील प्रत्येक ठेवीदारासाठी, समान हक्क आणि समान क्षमतेतील ठेवी एकत्र करून लागू होते.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Sep 28, 2026, 10:50 PM IST | Updated: Sep 28, 2026, 11:01 PM IST
Image Credit: मोठी रक्कम एफडीमध्ये ठेवताना एकाच बँकेत सर्व पैसे ठेवण्याऐवजी संबंधित बँकांची सुरक्षितता, व्याजदर आणि ठेवींचे विभाजन यांचा स्वतंत्र विचार करणे महत्त्वाचे आहे.
Join

बँकेत पैसे ठेवताना ग्राहकांना सर्वात मोठी चिंता असते ती म्हणजे, समजा बँक आर्थिक अडचणीत आली किंवा बँकेचा परवाना रद्द झाला तर एफडी आणि इतर ठेवींचे काय होणार? यासाठी भारतात डिपॉझिट इन्शुरन्स एण्ड गॅरन्टी कॉर्पोरेशन म्हणजेच डीआयसीजीसीची व्यवस्था आहे. डीआयसीजीसी ही RBIची पूर्ण मालकीची उपकंपनी असून, विमाधारक बँक बुडाल्यास किंवा आरबीआयकडून ठेवींवरील निर्बंध लागू झाल्यास ठेवीदारांना ठरावीक मर्यादेपर्यंत संरक्षण मिळते. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

10 लाखांची एफडी असेल तर 10 लाख मिळतील का?

डीआयसीजीसीच्या सध्याच्या नियमांनुसार एका विमाधारक बँकेत एका ठेवीदाराला मूळ रक्कम आणि जमा व्याज मिळून जास्तीत जास्त 5 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण आहे. त्यामुळे एखाद्या बँकेत तुमची एफडी 10 लाख रुपयांची असेल आणि संबंधित बँकेचे लिक्विडेशन झाले, तर डीआयसीजीसीकडून विमा संरक्षणाची कमाल मर्यादा 5 लाख रुपये असेल.

एकाच बँकेतील अनेक एफडी केल्या तरी मर्यादा वाढत नाही

समजा तुम्ही त्याच बँकेत 5 लाख, 3 लाख आणि 2 लाख अशा तीन वेगवेगळ्या एफडी केल्या आहेत. केवळ FD वेगवेगळ्या असल्यामुळे प्रत्येक एफडीला स्वतंत्र 5 लाखांचे संरक्षण मिळत नाही. एकाच व्यक्तीच्या, त्याच हक्काच्या आणि त्याच क्षमतेतील ठेवी एकत्र मोजल्या जातात. त्यामुळे संबंधित बँकेत तुमच्या सर्व अशा ठेवींची एकत्रित रक्कम विचारात घेतली जाते आणि विमा संरक्षणाची कमाल मर्यादा 5 लाख रुपये राहते.

मात्र वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसे असतील तर नियम वेगळा

जर तुमचे पैसे दोन किंवा अधिक वेगवेगळ्या बँकांमध्ये असतील, तर प्रत्येक बँकेसाठी 5 लाख रुपयांची विमा मर्यादा स्वतंत्रपणे लागू होते. उदाहरणार्थ, बँक ‘A’मध्ये 5 लाख आणि बँक ‘B’मध्ये 5 लाख ठेवी असतील, तर दोन्ही बँकांसाठी स्वतंत्र विमा संरक्षण लागू होऊ शकते. डीआयसीजीसीच्या माहितीनुसार, वेगवेगळ्या बँकांतील ठेवी एकत्र करून 5 लाखांची मर्यादा ठरवली जात नाही.

फक्त FD नाही, इतर ठेवींनाही संरक्षण

डीआयसीजीसीच्या विमा योजनेत सेव्हिंग अकाऊंट, करंट अकाऊंट, फिक्स्ड डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिट यांसारख्या पात्र ठेवींचा समावेश होतो. मात्र एकाच बँकेतील एकाच हक्काच्या आणि क्षमतेतील विविध खात्यांची रक्कम एकत्र केली जाते. या विमा मर्यादेत मूळ रक्कमेसोबत संबंधित तारखेपर्यंतचे पात्र व्याजही समाविष्ट असते.

बँक बुडाल्यावर पैसे कसे मिळतात?

बँक लिक्विडेशनमध्ये गेल्यास किंवा आरबीआयच्या अशा निर्देशांमुळे ठेवींवर पैसे काढण्याचे निर्बंध आले ज्यामुळे डीआयसीजीसीची जबाबदारी निर्माण होते, तेव्हा विमा प्रक्रियेनुसार दावा निश्चित केला जातो. लिक्विडेशनच्या प्रकरणात बँकेचा लिक्विडेटर ठेवीदारांची दावा यादी तयार करून डीआयसीजीसीकडे पाठवतो. डीआयसीजीसीच्या FAQनुसार, दावा यादी मिळाल्यानंतर पात्र रकमेची प्रक्रिया नियमानुसार केली जाते. त्यामुळे 10 लाखांची FD म्हणजे 10 लाखांची हमी नाही; सध्याच्या डीआयसीजीसी  विमा संरक्षणाची कमाल मर्यादा 5 लाख रुपये आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES