मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला हाकललं? VIDEO व्हायरल, महिला म्हणाली 'तुम्ही बाहेर जा....'
अभिनेता राजपाल यादवला मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून जाण्यास सांगितल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कर्करोगाशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर अभिनेते मुश्ताक खान यांचं निधन झालं. त्यांच्या शोकसभेला उपस्थित राहिलेल्या अभिनेत्यांमध्ये राजपाल यादवचाही समावेश होता. 30 सप्टेंबर रोजी झालेल्या या शोकसभेतील एका व्हिडिओमध्ये, राजपाल यादव प्रसारमाध्यमांशी बोलत असताना एक महिला ओरडताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे मुश्ताक खान यांच्या श्रद्धांजली सभेत अभिनेत्याचा अपमान झाल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता समोर आलेल्या आणखी एका व्हिडिओमुळे त्या कार्यक्रमात नेमके काय घडले होते, हे स्पष्ट झाले आहे.
राजपाल यादवला बाहेर जाण्यास सांगण्यात आले होते का?
एका व्हिडिओ क्लिपमध्ये 'भूल भुलैया' चित्रपटातील अभिनेता राजपाल माध्यमांशी बोलत असताना एक महिला ओरडताना दिसली. ती महिला म्हणाली, "आता तुम्हाला बाहेर पाठवले जाईल. आम्ही तुम्हाला समजावून सांगितले होते, तरीही तुम्ही असे का वागत आहात? सेल्फी घेण्यासाठी ही काही जागा आहे का?"
त्यावेळी, राजपाल यादव आणि त्याची टीम तिथून बाहेर पडताना त्या क्लिपमध्ये दिसले. या व्हिडिओमुळे ती महिला राजपाल यादववर ओरडत होती, अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र, नंतर समोर आलेल्या आणखी एका व्हिडिओतून नेमके काय घडले होते, हे स्पष्ट झाले.
त्या क्लिपमध्ये एक व्यक्ती राजपाल यादवसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तेव्हा त्या महिलेने मध्येच हस्तक्षेप केला आणि त्या व्यक्तीला प्रार्थना सभेतून बाहेर जाण्यास सांगितले.
राजपाल यादवने मुश्ताक खान यांच्या आठवणींना दिला उजाळा
श्रद्धांजली सभेत सहभागी झाल्यानंतर राजपाल यादवने मुश्ताक खान यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. "मुश्ताक भाईंच्या आत्म्यास शांती लाभो. ते अत्यंत निर्मळ मनाचे, एक चांगले माणूस आणि अत्यंत प्रतिभावान अभिनेते होते," असे तो म्हणाला.
यापूर्वी, राजपालने इन्स्टाग्रामवरूनही मुश्ताक यांना श्रद्धांजली वाहिली होती. एका पोस्टमध्ये त्याने नमूद केले की, मुश्ताक यांच्या निधनापूर्वी अवघ्या दोन तास आधीच त्यांची मुंबईतील नानावटी रुग्णालयात भेट झाली होती.
राजपाल यादव व्यतिरिक्त पूनम धिल्लन, राहुल रॉय, विंदू दारा सिंग, किरण कुमार, राखी सावंत, उपासना सिंग, सुनील पाल, एहसान कुरेशी, के.के. गोस्वामी आणि मुकेश ऋषी हे देखील या श्रद्धांजली सभेला उपस्थित होते. पण कोणताही मोठा अभिनेता शोकसभेसाठी हजर राहिला नाही अशी शोकांतिका व्यक्त केली जात आहे.