SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

जगभरातील भर दुपारीच पडणार अंधार? वेळ मोजण्याची पद्धत बदलणार; नेमकं कारण काय?

लीप सेकंदाची पद्धत बंद करण्यामागे आणखी एक कारण आहे. पृथ्वीचा फिरण्याचा वेग दीर्घकाळात कमी होत असला, तरी अलीकडच्या काही वर्षांत तो तुलनेने वाढल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Oct 14, 2026, 03:12 PM IST | Updated: Oct 14, 2026, 03:26 PM IST
Image Credit: जागतिक कालमापन
Join

आपण रोज पाहतो ते घड्याळ नेहमी 24 तासांचा दिवस दाखवते. मात्र, पृथ्वीच्या फिरण्याचा वेग आणि अणुघड्याळाने मोजलेली वेळ यांचा ताळमेळ राखण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून जागतिक वेळेत अधूनमधून एक अतिरिक्त सेकंद जोडला जातो. याला ‘लीप सेकंद’ म्हणतात. आता ही पद्धत बंद करण्याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू आहे. फ्रान्समधील व्हर्साय येथे आंतरराष्ट्रीय मापनविज्ञान संस्थेच्या बैठकीत 69 देशांचे प्रतिनिधी याबाबत निर्णय घेणार आहे. ही पद्धत बदलण्यामागे केवळ वेळ मोजण्याचा प्रश्न नसून इंटरनेट, बँकिंग, विमान वाहतूक आणि उपग्रह प्रणालींच्या सुरक्षिततेचाही मुद्दा आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

लीप सेकंद म्हणजे काय?

पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्यामुळे दिवस आणि रात्र होतात. मात्र, पृथ्वीचा फिरण्याचा वेग नेहमी सारखा नसतो. चंद्राचे गुरुत्वाकर्षण, समुद्रातील भरती-ओहोटी, पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली आणि हिमनद्या वितळण्यासारख्या घटकांमुळे तिच्या फिरण्याच्या वेगात बदल होऊ शकतो. दुसरीकडे, अणुघड्याळ अत्यंत अचूक पद्धतीने वेळ मोजते. या दोन्ही वेळांमधील फरक मर्यादेत ठेवण्यासाठी 1972 मध्ये लीप सेकंदाची पद्धत सुरू झाली. आतापर्यंत जागतिक वेळेत 27 वेळा अतिरिक्त सेकंद जोडण्यात आला आहे.

एका सेकंदामुळे तंत्रज्ञानाला धोका कसा?

सामान्य माणसासाठी एका सेकंदाचा फरक फारसा महत्त्वाचा वाटत नाही. मात्र, संगणक प्रणाली आणि डिजिटल व्यवहारांसाठी वेळेची अचूकता अत्यंत महत्त्वाची असते. इंटरनेट सर्व्हर, शेअर बाजार, ऑनलाइन बँकिंग, वीज वितरण आणि उपग्रह दिशादर्शन यांसारख्या प्रणाली अचूक वेळेवर अवलंबून असतात. घड्याळात अचानक एक सेकंद जोडल्यावर काही संगणक प्रणालींना त्या बदलाशी जुळवून घेण्यात अडचणी येऊ शकतात. 2012 मध्ये लीप सेकंदामुळे रेडिट आणि लिंक्डइनसारख्या सेवांमध्ये तांत्रिक अडचणी आल्या होत्या. 2016 मध्ये क्लाउडफ्लेअरच्या सर्व्हरवरही समस्या निर्माण झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे तंत्रज्ञान कंपन्या ही पद्धत बदलण्याच्या बाजूने आहेत.

आता सेकंद जोडण्याऐवजी कमी करावा लागू शकतो?

लीप सेकंदाची पद्धत बंद करण्यामागे आणखी एक कारण आहे. पृथ्वीचा फिरण्याचा वेग दीर्घकाळात कमी होत असला, तरी अलीकडच्या काही वर्षांत तो तुलनेने वाढल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. त्यामुळे भविष्यात घड्याळात एक सेकंद जोडण्याऐवजी एक सेकंद वजा करण्याची वेळ येऊ शकते. याला ‘नकारात्मक लीप सेकंद’ म्हणतात. आजपर्यंत अशी वेळ आलेली नाही. मात्र, संगणक प्रणालींना वेळेतील हा बदल हाताळणे अधिक कठीण ठरू शकते, अशी तज्ज्ञांना चिंता आहे. त्यामुळे भविष्यातील तांत्रिक धोके टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वेळ मोजण्याच्या नियमांत बदल करण्याचा विचार सुरू आहे.

2035 पर्यंत अंमलबजावणीचे नियोजन

आंतरराष्ट्रीय मापनविज्ञान संस्थेने 2022 मध्ये 2035 पर्यंत लीप सेकंदाची पद्धत बंद करण्याच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला होता. आता ही प्रक्रिया लवकर सुरू करण्याबाबत चर्चा होत आहे. काही वृत्तांनुसार, प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास मे 2027 पासून बदल लागू करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय आंतरराष्ट्रीय बैठकीतील मतदान आणि पुढील अधिकृत घोषणांवर अवलंबून आहे. त्यामुळे लीप सेकंद तातडीने बंद झाला आहे, असे सध्या म्हणता येणार नाही.

वेळ बदलली तर दुपारी अंधार पडणार का?

लीप सेकंद बंद केल्यास काही हजार वर्षांनी अणुघड्याळाची वेळ आणि पृथ्वीच्या फिरण्यावर आधारित वेळ यांच्यात मोठा फरक निर्माण होऊ शकतो. मात्र, त्यामुळे लगेच दिवस-रात्र किंवा आपल्या दैनंदिन वेळापत्रकात बदल होणार नाही. काही अंदाजांनुसार, दोन्ही वेळांमध्ये एक तासाचा फरक निर्माण होण्यासाठी किमान तीन हजार वर्षे लागू शकतात. भविष्यात गरज भासल्यास एकाच वेळी मोठा बदल करण्यासाठी ‘लीप आवर’ म्हणजेच अतिरिक्त तासाची संकल्पना विचारात घेतली जाऊ शकते. त्यामुळे हा बदल सामान्य नागरिकांच्या घड्याळातील वेळ तत्काळ बदलण्यासाठी नसून डिजिटल प्रणाली अधिक स्थिर ठेवण्यासाठी आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES