लादेन भारतात करणार होता हल्ला, अमेरिकेच्या CIA चा खळबळजनक दावा; नेमका काय होता लादेनचा प्लॅन हे ही सांगितलं
11 सप्टेंबर 2001 रोजी अल कायदाच्या 19 दहशतवाद्यांनी चार विमानांचं अपहरण केलं होतं. त्यातली दोन विमाने न्यू यॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर आदळली, एक पेन्टागॉनवर पडले आणि चौथे पेन्सिल्व्हेनियातील शेतात कोसळले होते.
अमेरिकेवर झालेल्या 9/11 हल्ल्याला महिन्याभरापूर्वीच 25 वर्ष पूर्ण झाली. याच पार्श्वभूमीवर अमेरिकी सरकारची मुख्य परदेशी गुप्तचर संस्था असलेल्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी सीआयएने ओसामा बिन लादेनशीसंबंधित 70 हून अधिक गुप्त अहवाल जगासमोर आणले असून यामधून काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये भारताबद्दलचाही एका हदरवून टाकणारा दावा आहे.
कोणत्या देशांवर हल्ल्याचा विचार होता?
100 हून अधिक पानांच्या या अहवालामध्ये, 28 ऑगस्ट 1998 च्या नोंदीमध्ये, अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन अनेक देशांवर दहशतवादी हल्ले करण्याचा विचार करत होता असं नमूद केलं आहे. लादेनच्या हिट लिस्टवर असलेल्या देशांमध्ये भारत, पाकिस्तान, इजिप्त, कुवेत, सौदी अरेबिया, येमेन, युगांडासारख्या देशांचा समावेश होता. तसेच लादेन नायजेरियावरही हल्ला करण्याच्या विचारात होता असा दावा सीआयएच्या अहवालामध्ये करण्यात आला आहे. “बिन लादेन टेररिस्ट नेटवर्क” असे शीर्षक असलेल्या या अहवालात माहितीचा स्रोत जाहीर करण्यात आलेला नाही केला आहे.
कधी, कुठे करणार होता हल्ला?
ओसामा बिन लादेन भारतावर हल्ला करण्याचा विचार करत होता असा दावा सीआयएकडून करण्यात आला असला तरी त्याचे कोणतेही विशिष्ट लक्ष्य कोणते होते? हल्ल्याची तारीख किंवा तपशीलवार योजना मात्र नमूद करण्यात आलेली नाही.
उभं करत होता नेटवर्क
याच अहवालात पुढे म्हटले आहे की, बिन लादेन उत्तर अमेरिका, युरोप आणि पूर्व आशियात मजबूत नेटवर्क उभे करत होता. अफगाणिस्तानातील शिबिरांवर अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही त्याचे नेटवर्क सक्रीय होते. त्याने काही शिबिरांत प्रशिक्षण पुन्हा सुरू झाले होते. तो अमेरिकेसोबतच ब्रिटनवरही हल्ला करण्याचा विचार करीत होता. शिवाय तो जगातील किमान 60 देशांतील व्यक्ती आणि गटांना हल्ल्यासाठी वापरू शकतो, असेही या अहवालात नमूद करण्यात आलेलं.
अनेकदा देण्यात आलेला हल्ल्याचा इशारा
या अहवालांमुळे स्पष्ट होते की, 1998 ते 2001 या काळात (बिल क्लिंटन आणि जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या अध्यक्षपदाच्या काळात) सीआयएने अमेरिकेवर संभाव्य दहशतवादी हल्ल्याबाबत अनेकदा इशारा दिला होता. सीआयएच्या मते, ही कागदपत्रे अमेरिकेच्या सर्वात संवेदनशील गुप्तवार्ता प्रकाशनातील “अभूतपूर्व पारदर्शकता” दाखवतात. 11 सप्टेंबर 2001 रोजी अल कायदाच्या 19 दहशतवाद्यांनी चार विमानांचं अपहरण केलं होतं. त्यातली दोन विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरवर आदळली, एक पेन्टागॉनवर पडले आणि चौथे पेन्सिल्व्हेनियातील शेतात कोसळले होते.