'.... तर आम्ही मोठ्या फरकाने जिंकलो असतो', मध्यावधी निवडणुकीत पक्ष पराभवाच्या दिशेने जाऊ लागल्यानंतर ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला असून, रिपब्लिकन पक्षाचा मोठा पराभव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅट्स हाऊस जिंकण्याचा अंदाज असून सिनेटवरही ताबा मिळवण्याच्या तयारीत असताना, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. जर आपण निवडणूक लढलो असतो तर त्यांच्या रिपब्लिकन पक्षाने प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला असता असा दावा त्यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
"माझे नाव मतपत्रिकेवर नव्हते आणि जर असते, तर आम्ही प्रचंड मताधिक्याने जिंकलो असतो! या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद," असे ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या प्लॅटफॉर्मवरील एपोस्टमध्ये म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी या निवडणुका महत्त्वाच्या असून, त्यांचं भविष्य ठरवणारी आहे. या निवडणुका ट्रम्प यांच्या वादळी दुसऱ्या कार्यकाळावर देशव्यापी निकाल देणाऱ्या होत्या. महागाई, आयात शुल्क आणि इंधनाच्या किंमती वाढवण्यासाठी कारणीभूत ठरलेले इराणविरुद्धचे अमेरिकेचे युद्ध यांवरील असंतोषाचा दबाव रिपब्लिकन पक्षावर होता, कारण त्यांची लोकप्रियता विक्रमी नीचांकी पातळीजवळ घसरली होती.
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज'च्या सर्व 435 जागा, सिनेटच्या 35 जागा आणि 36 राज्यांमधील गव्हर्नरपदांसाठी मतदान झाले असून, मतमोजणीला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, या मध्यावधी निवडणुकांचे निकाल 2028 च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या राजकीय दिशेलाही आकार देऊ शकतात.
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांचे सुरुवातीचे कल समोर येऊ लागले आहेत, त्यावरुन डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर भविष्यात अधिक मोठी आव्हाने उभी राहू शकतात असे दिसत आहे. सुरुवातीच्या संकेतांनुसार, दोन्ही सभागृहांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला आघाडी मिळत असल्याचे दिसत आहे.
हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज: या सभागृहात एकूण 435 जागा आहेत आणि या सर्व जागांसाठी मध्यावधी निवडणुका झाल्या आहेत. सध्याच्या सुरुवातीच्या कलानुसार, डेमोक्रॅटिक पक्ष 140 जागांवर आघाडीवर आहे, तर डोनाल्ड ट्रम्प यांचा रिपब्लिकन 80 जागांवर पुढे आहे.
सिनेट: या मध्यावधी निवडणुकांमध्ये सिनेटच्या 100 पैकी 35 जागांसाठी मतदान झाले. सध्या मतमोजणी सुरू आहे. यापैकी 20 जागांच्या सुरुवातीच्या निकालांनुसार, डेमोक्रॅटिक पक्षाने 12 जागा जिंकल्या आहेत, तर रिपब्लिकन पक्षाला 8 जागा मिळाल्या आहेत. ही परिस्थिती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी अत्यंत कठीण काळ असल्याचे मानले जात आहे.