घरीच बनवा सीताफळाची रबडी! तोंडात विरघळेल तिची मलाईदार चव; 'अशी' बनवा झटपट रेसिपी
सीताफळापासून बनवलेली रबडी अतिशय चविष्ट लागते. काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही ती अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात तयार करू शकता.
Published: Oct 04, 2026, 06:13 PM IST
| Updated: Oct 04, 2026, 06:21 PM IST
सीताफळ म्हटलं की त्याची गोड, मऊ आणि क्रीमी चव आठवते. याच सीताफळापासून तयार केलेली रबडी चवीला इतकी भन्नाट लागते की एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. विशेष म्हणजे ही रबडी तयार करण्यासाठी फार वेळही लागत नाही. दूधाची पारंपरिक रबडी तुम्ही अनेकदा खाल्ली असेल; पण सीताफळाची रबडी ही काहीशी वेगळी आणि तितकीच स्वादिष्ट मिठाई आहे. सण-समारंभात किंवा घरी काहीतरी खास गोड बनवायचं असेल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.
सीताफळाची रबडी बनवण्यासाठी साहित्य
- फुल क्रीम दूध – १ लिटर
- पिकलेल्या सीताफळाचा गर – १ कप
- साखर – ३ ते ४ टेबलस्पून
- वेलची पूड – ½ टीस्पून
- केशराच्या काड्या – ८ ते १०
- चिरलेले ड्रायफ्रूट्स – २ टेबलस्पून
- गुलाबजल – १ टीस्पून
सीताफळाची रबडी कशी बनवायची?
- पिकलेलं सीताफळ कापून त्यातील गर चमच्याच्या मदतीने एका भांड्यात काढा.
- सीताफळाचा गर गाळणीमध्ये घेऊन हलक्या हाताने दाबा, जेणेकरून बिया वेगळ्या होतील आणि मऊ गर मिळेल. हा गर बाजूला ठेवून द्या.
- एका जाड बुडाच्या पॅनमध्ये दूध घेऊन सुरुवातीला ते उकळून घ्या. त्यानंतर गॅस मंद करून दूध आटू द्या. दूध तळाला लागू नये म्हणून अधूनमधून ढवळत राहा. पॅनच्या कडेला लागलेली मलाईही खरवडून दुधात मिसळा.
- दूध साधारण एक तृतीयांश उरलं की त्यात साखर, केशर आणि वेलची पूड घाला. हे मिश्रण आणखी २ ते ३ मिनिटं मंद आचेवर शिजवा.
- गॅस बंद करून रबडीचं मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. हा टप्पा महत्त्वाचा आहे, कारण गरम दुधात सीताफळाचा गर मिसळल्यास चव आणि पोत बिघडू शकतो.
- दूध पूर्ण थंड झाल्यावर त्यात तयार केलेला सीताफळाचा गर घाला आणि व्यवस्थित एकजीव करून घ्या.
- आता त्यात गुलाबजल आणि चिरलेले ड्रायफ्रूट्स घाला. सगळं नीट मिसळून रबडी काही वेळ फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.
- थंडगार सीताफळाची रबडी बाहेर काढा, वरून ड्रायफ्रूट्सने सजवा आणि सर्व्ह करा.
मलाईदार रबडीसोबत सीताफळाची नैसर्गिक गोड चव आणि वेलची-केशराचा सुगंध यामुळे ही मिठाई अगदी खास बनते. सणासुदीला नेहमीच्या मिठाईपेक्षा काहीतरी वेगळं करून पाहायचं असेल, तर सीताफळाची रबडी नक्की करून पाहा.