बीडच्या कपिलधार कार्तिक पौर्णिमा यात्रेवर यंदा भीषण दुष्काळाचं सावट, 25 वर्षांत भाविकांवर आली स्नानाविना दर्शन घेण्याची वेळ
बीडच्या श्रीक्षेत्र कपिलधार येथील प्रसिद्ध कार्तिक पौर्णिमा यात्रेवर यंदा भीषण दुष्काळाचं सावट पसरलं आहे.
संत शिरोमणी मन्मथ स्वामींच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक इथे दाखल होतात. मात्र, तीव्र पाणीटंचाईमुळे यंदा 'दर्शनानंतर परतीचा प्रवास करा, मुक्काम टाळा', असं आवाहन देवस्थान ट्रस्टने केलं आहे. विशेष म्हणजे, गेल्या 25 वर्षांत पहिल्यांदाच इथला प्रसिद्ध धबधबा कोरडा पडल्याने भाविकांवर स्नानाविना दर्शन घेण्याची वेळ आलीय.
चारही बाजूंनी डोंगरकपारीत वसलेलं हे आहे बीडपासून अवघ्या 22 किलोमीटर अंतरावरील श्रीक्षेत्र कपिलधार. इसवी सन 1631 मध्ये संत शिरोमणी मन्मथ स्वामींनी याच ठिकाणी जिवंत संजीवन समाधी घेतली. गेल्या साडेचारशे वर्षांपासून महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातून लाखो भाविक या पवित्र भूमीत दाखल होतात. मात्र, यंदा या तीर्थक्षेत्राला भीषण दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. धबधबा कोरडा पडल्याने पाण्याअभावी भाविकांनी मुक्काम न करता केवळ दर्शन घेऊन परतावं, असं हतबल आवाहन देवस्थान ट्रस्टला करावं लागलं आहे.
तुळशी विवाहाच्या दिवसापासून इथे महापूजेला सुरुवात होते आणि यात्रेचा उत्साह शिगेला पोहोचतो. कपिलधारच्या पवित्र धबधब्यात स्नान करूनच मन्मथ स्वामींच्या समाधीचं दर्शन घेण्याची साडेचारशे वर्षांची अखंड परंपरा आहे. मात्र, गेल्या 25 वर्षांत पहिल्यांदाच हा धबधबा पूर्णपणे कोरडा पडल्याने या विधिवत परंपरेत मोठा खंड पडला आहे.
एरवी नोव्हेंबर महिन्यात खळखळणारा हा धबधबा आज कोरडाठाक पडला आहे. भाविकांची आस्था जपण्यासाठी मंदिर प्रशासनाने एका पाईपद्वारे कुंडात पाणी सोडून कृत्रिम धबधबा तयार करण्याचा प्रयत्न केला. पण यामुळे भाविकांचा मोठा हिरमोड झाला आहे. स्नानाऐवजी केवळ पाण्याचा स्पर्श करून दर्शन घेण्याची वेळ भक्तांवर आली आहे. इतकंच नाही, तर कुंडात सोडलेलं पाणी स्वच्छ नसल्याचा आरोपही भाविकांनी केला आहे. प्रशासनाने यात्रेचं गांभीर्य ओळखून तातडीने स्वच्छ पाण्याची सोय करावी, अशी आर्त मागणी भक्तांकडून होत आहे.
कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून अनेक भाविक इथे मुक्कामासाठी येतात. इथल्या पवित्र जलात स्नान केल्याशिवाय दर्शन पूर्ण होत नाही, अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे. मात्र, यंदा कुंडातील साचलेलंच पाणी पुन्हा उपसा करून वरून सोडलं जात असल्याने भाविक कमालीचे नाराज आहेत. अस्वच्छ पाण्यामुळे धार्मिक आस्थेला धक्का बसत असल्याची भावना भक्तांमध्ये आहे. त्यामुळे प्रशासनाने भाविकांच्या श्रद्धेचा मान राखत स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
साडेचारशे वर्षांची श्रद्धा आणि परंपरेचा वारसा जपणाऱ्या कपिलधार यात्रेवर यंदा दुष्काळाचं गडद सावट आहे. भक्तांच्या मनात भक्तीचा उत्साह कायम असला, तरी पाण्याअभावी धार्मिक विधींवर मर्यादा आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर निराशा आहे. भक्तीच्या या वाटेवर दुष्काळाचं संकट नको, तर श्रद्धेला प्रशासनाच्या सुविधांची साथ मिळावी, हीच अपेक्षा राज्यातून आलेले लाखो भाविक व्यक्त करत आहेत.