ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला, चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर, 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट
चक्रीवादळामुळं पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. आज राज्यातील कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट, जाणून घेऊयात.
अर्णब चक्रीवादळानंतर भारताच्या किनारपट्टीवर आणखी एक वादळ घोंगावतंय. मुरासू चक्रीवादळामुळं राज्यात पावसाला पोषक हवामान निर्माण झालं आहे. त्यामुळं राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरावरील तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचे रविवारी चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. हे चक्रीवादळ 3 नोव्हेंबर रोजी आंध प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या कालावधीत वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 110 किलोमीटर आणि झंझावाताचा वेग ताशी 120 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी केला आहे. कोकणातील रायगड, मध्य महाराष्ट्रातील रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज आहे.
मोसमी पावसाच्या हंगामानंतर ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस काहीसा दिलासा देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने राज्यात 1 ते 31 ऑक्टोबरदरम्यान 95 टक्के इतकी पावसाची तूट निर्माण झाली आहे.
वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाख
रत्नागिरी जिल्ह्याला काल वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले आहे. जिल्ह्यात अचानक आलेल्या परतीच्या पावसाने आणि ताशी 40 ते 60 किमी वेगाने सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने एकच दाणादाण उडवून दिली आहे. विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या हलक्या सरींमुळे चिपळूण, संगमेश्वर आणि खेडसह अनेक तालुक्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
वादळी वाऱ्यामुळे बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांची मोठी धांदल उडाली, तर ग्रामीण भागातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. दरम्यान,तोंडाशी आलेले भात पीक कापणीच्या मार्गावर असतानाच या पावसाचे थैमान सुरू झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे.
येवल्यात मध्यरात्री मुसळधार अवकाळी पाऊस
नाशिकच्या येवल्यात मध्यरात्री मुसळधार अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात येवला, निफाड ,सिन्नर परिसरात मुसळधार पावसाची जोरदार हजेरी लावली. सोमवारी, 2 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली.