दुष्काळामुळे शेतक-यांच्या मुलांची लग्न रखडली; सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्याचे संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांचं आवाहन
यंदा दुष्काळाने हेच गणित बिघडल.अनेकांची लग्नं ठरली आहेत. मुहूर्त ठरलेत. मात्र शेतीतून उत्पन्नच हाती न आल्याने लग्नाचा खर्च करायचा कसा, हा प्रश्न उभा राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी सामाजिक संस्थांसह दानशूर व्यक्तींना पुढे येण्याचं आवाहन केले.
विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर : यंदाचा दुष्काळ भीषण असणार आहे. त्यामुळे बळीराजाचं आर्थिक गणित पुरतं कोलमडणार आहे. दैनंदिन गरजांवर संकट येणार आहे. मुला मुलींच्या लग्नाचीही मोठी अडचण होणार आहे. यावरच उपाय म्हणून आता सामूहिक लग्नाबाबत चर्चा सुरू झाली आहे. याबाबत विभागीय प्रशासनानं पुढाकार घेतला आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी लग्नं आयोजित करावी. प्रशासन पूर्ण मदत करेल, असं आवाहन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले. त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतं.
लग्न म्हणजे आयुष्यातील एक मोठा आनंदाचा क्षण. मुलीच्या वडिलांसाठी तर लग्न म्हणजे आनंदाच्या क्षणासोबत खर्चाच्या चिंतेचीही बाब असते. यंदा मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे...त्यामुळं शेतकऱ्यांच्या अनेक मुला-मुलींची लग्न रद्द होऊ शकतात, पुढे ढकलली जाऊ शकतात. यावरच प्रशासनाने पुढाकार घेत सामूहिक लग्नाबाबत चर्चा सुरू केली आहे. यापुढे लग्नाच्या मौसमात सामूहिक लग्न आयोजित करावे असं आवाहन विभागीय प्रशासनाने जनतेला केले.
जे मोठे लोक आलिशान लग्न करतात त्यांनीही त्या लग्नात काही शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या लग्नाचा समावेश करावा असंही आवाहन विभागीय आयुक्त यांनी केले. या लग्नाच्या आयोजनात प्रशासन सर्वतोपरी मदत करेल. सोबतच लग्नात अधिकारी सुद्धा हजर राहतील. अगदी तहसीलदारापासून विभागीय आयुक्त लग्नांमध्ये हजेरी लावणार आहेत. तिथल्या सोयीवर लक्ष ठेवून मदत करतील, असं विभागीय प्रशासनानं स्पष्ट केले. मुलीच्या लग्नाच्या चिंतेनं अनेक शेतकरी टोकाचं पाऊल उचलतात. या संकटाच्या वेळी असं टोकाचं पाऊल किमान लग्नाच्या चिंतेमुळे कोणी उचलू नये. सोबतच त्याच्या आयुष्यातला आनंदही कायम राहावा, यासाठी हा पुढाकार घेतल्याचं विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले.
या आवाहनाला संभाजीनगरच्या केटरिंग असोसिएशनदेखील प्रतिसाद दिला. 100 लग्न सोहळ्याची जबाबदारी त्यांनी घेतल्याचं जी. श्रीकांत यांनी सांगितलं. इतकंच नाही तर सामुदायिक विवाहाचा निर्णय कुणी करत असेल तर मंगल कार्यालय मोफत देणार असल्याचा निर्णय मंगल कार्यालयाच्या मालकांनी घेतला.
यंदा भीषण दुष्काळाच्या झळा बसणार आहेत. त्यामुळं शिक्षणाचा प्रश्न उपस्थित होणार आहे. बळीराजाच्या मुला-मुलींच्या लग्नाचा प्रश्नही उपस्थित होणार आहे. मोठं आर्थिक संकट आ वासून उभं ठाकले. त्यामुळं विभागीय आयुक्त कार्यालयानं लग्नासाठी घेतलेला हा पुढाकार निश्चितच स्तुत्य उपक्रम मानला जात आहे.