49 लाखांचा अंमली पदार्थांचा साठा पोलिसांकडून भस्मसात; 343 किलो गांजा-चरस, 499 कोडिन सिरपच्या बाटल्या नष्ट
छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेला तब्बल 49 लाख 2 हजार 883 रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा पोलिसांनी नष्ट केला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेला तब्बल 49 लाख 2 हजार 883 रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा पोलिसांनी नष्ट केला आहे. पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ प्रतिबंधक विभाग आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत हा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून भस्मसात करण्यात आला.
वाळूज एमआयडीसी, उस्मानपुरा, सिटी चौक, वेदांतनगर, हर्सूल, दौलताबाद, सिडको, सिडको एमआयडीसी, बेगमपुरा, वाळूज, सातारा आणि क्रांती चौक या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून हा अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता. यामध्ये तब्बल 343 किलो 573 ग्रॅम गांजा आणि चरस, तसेच नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कोडिन सिरपच्या 499 बाटल्यांचा समावेश होता. कडक पोलीस बंदोबस्तात हा सर्व मुद्देमाल पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील शासनमान्य महाराष्ट्र एन्व्हायरनमेंट पॉवर लिमिटेड कंपनीत नेण्यात आला. पर्यावरण आणि कायदेशीर नियमांचे पालन करून हा संपूर्ण अंमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यात आला आहे.
मुंबईत आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश
मुंबईत अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कारवाई करत एमआयडीसी पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळीतील दोन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून तब्बल 12 किलो 390 ग्रॅम केटामाईन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजे किंमत 37 कोटी 17 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
24 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 11 वाजता अंधेरी पूर्व, विमानतळ मेट्रो स्टेशनजवळ कुर्ला रोड परिसरात दोन संशयित व्यक्ती ट्रॅव्हल बॅग घेऊन फिरताना पोलिसांच्या निदर्शनास आले. एमआयडीसी पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने त्यांची चौकशी केली असता दोघांच्या हालचाली संशयास्पद आढळल्या.
झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यात पांढऱ्या रंगाची क्रिस्टल पावडर आढळून आली. तपासणी केल्यानंतर हा पदार्थ केटामाईन असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी अदनान अहमद नियाज अहमद सिद्दीकी, वय 35 वर्षे आणि सईद मुश्ताक मणियार, वय 29 वर्षे या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, अटक करण्यात आलेले आरोपी आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंधित असून अमली पदार्थ खाद्यपदार्थांमध्ये लपवून थायलंड, इंडोनेशिया, म्यानमार आणि मलेशिया यांसारख्या देशांमध्ये हवाई मार्गाने पाठवले जात असल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत असून, या आंतरराष्ट्रीय तस्करीच्या नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे