SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

महाराष्ट्रात दुष्काळाचे अत्यंत भयानक वास्तव! बीडची 550 वर्ष जुनी खजाना विहीर कोरडी पडली

ज्या विहिरीनं शतकानुशतकं तहान भागवली, शेतीला पाणी दिलं आणि बीडच्या समृद्ध इतिहासाची साक्ष जपली. तीच खजाना विहीर आज कोरडी पडली आहे. साडेपाचशे वर्षांचा इतिहास आणि सलग दुसऱ्या वर्षी आटलेली विहीर, कमी पाऊस आणि खालावलेली भूजल पातळी. यामुळे ऐतिहासिक जलस्रोताच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 21, 2026, 11:59 PM IST | Updated: Oct 22, 2026, 12:03 AM IST
Join

बीड :  बीडच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारी आणि शेकडो वर्षांपासून पाण्याने भरलेली असलेली खजाना विहीर दुसऱ्यांदा कोरडी पडली आहे. कमी पाऊस आणि खालावलेली भूजल पातळी यामुळे ऐतिहासिक वारशावरच संकट ओढवलं आहे. तब्बल साडेपाचशे वर्षांचा इतिहास असलेली ही विहीर सलग दुसऱ्या वर्षी आटल्याने बीडकरांसह जलतज्ज्ञ आणि इतिहास संशोधकांची चिंता वाढली आहे. ही केवळ एका विहिरीच्या आटण्याची घटना नाही, तर भविष्यातील पाणीटंचाईचे गांभीर्य अधोरेखित करणारा इशारा आहे
 

सोळाव्या शतकात अहमदनगरचे राजा मुर्तुजा खान यांच्या आदेशानुसार बीडचे सरदार सलाबत खान यांच्यामार्फत शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या विहिरीची निर्मिती करण्यात आल्याचं सांगितलं जातं. भूजलशास्त्रज्ञ राजा भास्कर यांनी खजिन्यातील पैशातून ही विहीर बांधल्यामुळे तिला ''खजाना विहीर'' असं नाव पडलं. जमिनीपासून २३ पूर्णांक ५ फूट खोल आणि १० पूर्णांक ६० फूट व्यास असलेल्या या विहिरीत बारमाही पाणी उपलब्ध असायचं. या विहिरीच्या पाण्यावर एकेकाळी बलगुजार परिसरातील सुमारे ५०० हेक्टर शेती सिंचनाखाली होती. शेतीसह नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यातही या विहिरीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे खजाना विहीर म्हणजे बीडच्या ऐतिहासिक वैभवाबरोबरच जलव्यवस्थापनाच्या समृद्ध परंपरेची साक्ष आहे.

साडेचारशे ते पाचशे वर्षांपूर्वी विकसित करण्यात आलेली या विहिरीची जलव्यवस्था आजही अभ्यासाचा विषय आहे. विहिरीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिचं भूमिगत बोगदा तंत्रज्ञान. पूर्व आणि पश्चिम दिशांना असलेले बोगदे, त्यांची एकत्रित सुमारे ८ हजार 140  फूट लांबी, सहा फूट उंची आणि चार फूट रुंदी, ही या स्थापत्याची वैशिष्ट्यं आहेत. हे बोगदे बालाघाटच्या डोंगररांगांशी आणि बिंदुसरा नदीच्या पात्राखालून जाणाऱ्या जलमार्गाशी जोडलेले असल्याचं सांगितलं जातं. या मार्गावर असलेले 52  हौदही या जलव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. औरंगाबादच्या ऐतिहासिक पाणचक्कीशी साम्य सांगितलं जाणारं हे तंत्रज्ञान तत्कालीन जलव्यवस्थापनाच्या कौशल्याची साक्ष देतं.

मात्र, शेकडो वर्षे पाणी देणारी ही विहीर आता सलग दुसऱ्या वर्षी आटली आहे. मागील वर्षी विहीर कोरडी पडली, तेव्हाच भूजल पातळीतील घसरणीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. यंदाही तीच परिस्थिती कायम राहिल्याने या ऐतिहासिक जलस्रोताच्या भवितव्याबरोबरच परिसरातील भूजल साठ्याबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत. विहीर आटणं म्हणजे दुष्काळ येणारच, असा निष्कर्ष काढता येत नसला, तरी या घटनेमागील कारणांचा शास्त्रीय अभ्यास होणं अत्यंत आवश्यक आहे.

बीड, शिरूर, आष्टी, गेवराई आणि पाटोदा या तालुक्यांमध्ये कमी पावसामुळे पाणीटंचाईचं संकट अधिक गंभीर होत आहे. अशा परिस्थितीत खजाना विहिरीचं आटणं हा केवळ ऐतिहासिक वारशाच्या दृष्टीने नव्हे, तर भूजल व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा इशारा मानला जात आहे. पावसाचं बदलतं प्रमाण, भूजलाचा वाढता उपसा आणि पाण्याचं नियोजन या सगळ्या बाबींचा एकत्रित विचार करण्याची गरज आहे.

एकीकडे शेकडो वर्षांपूर्वीच्या स्थापत्यकलेतून साकारलेली ही जलव्यवस्था आजही आश्चर्यचकित करते, तर दुसरीकडे तिचं कोरडं पडणं वर्तमानातील जलसंकटाची जाणीव करून देतं. त्यामुळे या विहिरीचं शास्त्रीय सर्वेक्षण, भूमिगत बोगद्यांची तपासणी, जलस्रोतांचं पुनरुज्जीवन आणि ऐतिहासिक वास्तूचं संवर्धन यासाठी राज्य शासन आणि संबंधित यंत्रणांनी ठोस पावलं उचलण्याची मागणी इतिहास संशोधकांकडून होत आहे.

शेकडो वर्षांपूर्वी पाण्याचं नियोजन करणाऱ्या आपल्या पूर्वजांनी उभारलेली खजाना विहीर आज मात्र पाण्याविना उभी आहे. काळाच्या अनेक परीक्षा पार केलेल्या या ऐतिहासिक जलस्रोताला आता हवाय तो केवळ संवर्धनाचा हात नव्हे, तर त्यामागच्या जलतंत्रज्ञानाचा शास्त्रीय अभ्यास आणि पाणी जपण्याचा ठोस निर्धार. कारण खजाना विहीर आटली, म्हणजे केवळ इतिहासाची एक खूण कोरडी पडली असं नाही; तर भविष्यातील पाणीटंचाईबाबत सावध होण्याची वेळ आली आहे. हा ऐतिहासिक ठेवा जपतानाच पाण्याचा प्रत्येक थेंब जपला, तरच पुढच्या पिढ्यांसाठी हा वारसा आणि पाण्याची आशा टिकवता येईल. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES