महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरातील VIP दर्शन पासमध्ये मोठा घोटाळा; जनसंपर्क अधिकाऱ्यावर कारवाई
तुळजाभवानी मंदिरातील VIP दर्शन पासमध्ये घोटाळा उघडकीस आला आहे. नियमबाह्य पास वाटपप्रकरणी तत्कालीन जनसंपर्क अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली.
ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडेतीन शक्तिपिठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी मंदिरात लाखो भाविक दर्शनसाठी येतात. तुळजाभवानी मंदिरातील VIP दर्शन पासमध्ये घोटाळा झाला आहे. नियमबाह्य पास वाटपप्रकरणी तत्कालीन जनसंपर्क अधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे.
तुळजाभवानी मंदिरातील VIP दर्शन पास वाटपावरून आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नियमबाह्य पद्धतीने VIP दर्शन पास वितरित केल्याप्रकरणी तत्कालीन जनसंपर्क अधिकारी गणेश मोटे यांची एक वार्षिक वेतनवाढ रोखण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते जयकुमार पांढरे यांनी VIP दर्शन पासमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत गणेश मोटे यांनी नियमबाह्य पद्धतीने दर्शन पास वितरित केल्याचं निष्पन्न झाल्याचं आदेशात नमूद करण्यात आलं आहे. यानंतर मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तथा तहसीलदार माया माने यांनी गणेश मोटे यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांची गर्दी आणि VIP दर्शनाची मागणी लक्षात घेता दर्शन पास व्यवस्थापनाला मोठं महत्त्व आहे. मात्र, याच VIP दर्शन पासच्या वाटपात नियमबाह्य प्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते जयकुमार पांढरे यांनी VIP दर्शन पास वाटपातील गैरव्यवहाराबाबत तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे तत्कालीन जनसंपर्क अधिकारी गणेश मोटे यांची चौकशी करण्यात आली.
चौकशीनंतर गणेश मोटे यांनी नियमबाह्य पद्धतीने दर्शन पास वितरित केल्याचं निष्पन्न झाल्याचं कारवाईच्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. याच प्रकरणात त्यांची एक वार्षिक वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात केवळ तत्कालीन अधिकाऱ्यावर झालेली कारवाई पुरेशी आहे का? VIP दर्शन पास वाटपाची संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी होती? किती पास वितरित करण्यात आले? कोणत्या नियमांच्या आधारे पास देण्यात आले? आणि नियमबाह्य पद्धतीने पास वितरित झाले असतील, तर त्याची जबाबदारी आणखी कोणाची? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. मंदिर संस्थान मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायला तयार नाही.
तुळजाभवानी देवीच्या मंदिरात व्हीआयपी दर्शन पासच्या या घोटाळ्यामुळे देवीची भक्त मात्र चांगलेच संतापले आहेत. सर्व व्हीआयपी पास बंद करा अशी भक्तांची मागणी आहे तर पुजाऱ्याने देखील या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. तुळजाभवानी मंदिरातील VIP दर्शन पासच्या कथित गैरव्यवहाराची तक्रार झाली. चौकशी झाली आणि चौकशीत नियमबाह्य पद्धतीने पास वितरित केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर तत्कालीन जनसंपर्क अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली. मात्र या कारवाईनंतर आता VIP दर्शन पासची संपूर्ण व्यवस्था पारदर्शक करण्याची मागणी होत आहे. भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र असलेल्या तुळजाभवानी मंदिरातील पास व्यवस्थेत भविष्यात गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी मंदिर प्रशासन काय पावलं उचलतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.