झेप्टोच्या स्टोअरमध्ये 5 तरुणींचा लैंगिक छळ; मनसे कार्यकर्त्यांनी मॅनेजरला चोपले
मीरा रोड मध्ये झेप्टोच्या स्टोअर मॅनेजरकडून पाच तरुणींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला. मनसे कार्यकर्त्यांनी मॅनेजरला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
मिरा रोड क्राईम : मिरा रोड येथील शिवार गार्डन परिसरातील झेप्टो स्टोअरमध्ये काम करणाऱ्या पाच तरुणींना स्टोअर मॅनेजरकडून लैंगिक छळ केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. जय पाठक असे या स्टोअर मॅनेजरचे नाव असून, तो तरुणींना अयोग्य पद्धतीने स्पर्श करून त्यांचा छळ करत असल्याचा आरोप आहे. गेल्या महिनाभरापासून हा प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या त्रासाला कंटाळलेल्या तरुणींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे धाव घेतल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी स्टोअरमध्ये जाऊन पाठक याला चोप दिला. त्यानंतर त्याला मीरा रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित स्टोअरमध्ये काम करणाऱ्या तरुणींना जय पाठक याच्याकडून सातत्याने त्रास दिला जात होता. कामाच्या ठिकाणी तो त्यांना अयोग्य पद्धतीने स्पर्श करत असल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या पाच तरुणींनी मनसेकडे तक्रार केली होती. त्यापैकी एका तरुणीने महिनाभरापूर्वीच या स्टोअरमध्ये कामाला सुरुवात केली होती.
तरुणींच्या तक्रारीची दखल घेत मनसे कार्यकर्ते 10 ऑक्टोंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास झेप्टो स्टोअरमध्ये दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी स्टोअर मॅनेजर जय पाठक याला चोप दिला. त्यानंतर त्याला मीरा रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
मनसेचा वाहतूक कोंडी विरोधात प्रशासनाला एक आठवड्याचा अल्टीमेटम
कल्याण डोंबिवली भागातील वाहतूक कोंडी विरोधात मनसेनं आज जन आंदोलन केलं. या जनआंदोलनात मनसे नेते राजू पाटील यांनी धंदा व्हावा म्हणून टोलनाके २४ तास चालू ठेवतात,त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते असा आरोप केला. त्यामुळे प्रशासनाला एक आठवड्याचा अल्टिमेटम दिला आहे. एक आठवड्यानंतर टोल नाके फोडणार ते कुणाला सांगून फोडणार नाही असा खळखट्याकचा इशारा मनसेने दिलाय. कल्याणच्या कल्याण फाटा परिसरात आज मनसे च्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय जन आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला समाजवादी पार्टी,राष्ट्रवादी Sp, युबीटी, काँग्रेस पक्षांने देखील पाठिंबा दिला. या आंदोलनात वाहतूक कोंडीने त्रासलेले नागरिकांनी देखील उस्फुर्त सहभाग घेतला होता.काहींनी तर या वाहतूक कोंडीमुळे नोकऱ्या सोडल्याचं सांगितलं. त्यामुळे आता वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी प्रशासन काय उपाययोजना करते ते पाहावं लागेल.