SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

समृद्धी, मुंबई-पुणे द्रुतगती आणि मुंबई-गोवा महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा; अपघातग्रस्तांना तातडीचे उपचार मिळणार

नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू होणार आहे. ‘गोल्डन अवर’मध्ये अपघातग्रस्तांना तातडीचे उपचार मिळणार आहेत; समृद्धी, मुंबई-पुणे द्रुतगती आणि मुंबई-गोवा महामार्गांवर विशेष यंत्रणा उभारण्याचे नियोजन असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 13, 2026, 06:58 PM IST | Updated: Oct 13, 2026, 07:06 PM IST
Join

मुंबई : राज्यातील महामार्गांवर होणाऱ्या गंभीर रस्ते अपघातांतील जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचविण्यास मदत व्हावी, या उद्देशाने ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. अपघातानंतरचा पहिला तास, म्हणजेच ‘गोल्डन अवर’, हा जखमींच्या उपचारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. या निर्णायक काळात जखमींना तातडीने ट्रॉमा केअर सेंटरपर्यंत पोहोचविण्यासाठी हवाई रुग्णवाहिका सेवा प्रभावी ठरू शकते, अशी भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली.

या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, आरोग्य विभागाचे संचालक संजय काटकर वाहतूक पोलीस विभागाचे अधीक्षक डॉ सुनील भारद्वाज यांच्यासह मोटार परिवहन विभाग, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वेळापत्रक निश्चित

या प्रकल्पासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत प्रमाणित कार्यपद्धती (SOP) तयार करून तिला मंजुरी घेण्याचे नियोजन आहे. त्यानंतर नोव्हेंबरअखेर उच्चाधिकार समितीची मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेनंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

राज्यात दरवर्षी सुमारे 15 हजार रस्ते अपघात होत असल्याची माहिती आहे. यापैकी अनेक अपघातांमध्ये जखमींना वेळेत उपचार मिळणे हे मोठे आव्हान ठरते. विशेषतः महामार्गांवरील गंभीर अपघात, वाहतूक कोंडी, रुग्णालयापर्यंतचे अंतर आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधांची उपलब्धता या बाबी लक्षात घेता, अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे.

समृद्धी, मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा महामार्गांना प्राधान्य

समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्ग या महत्त्वाच्या मार्गांवर अपघातग्रस्तांना जलद वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. या यंत्रणेअंतर्गत हवाई रुग्णवाहिका सेवेची उपलब्धता, जखमींना सुरक्षितपणे ट्रॉमा केअर सेंटरपर्यंत पोहोचविण्याची कार्यपद्धती आणि विविध आपत्कालीन यंत्रणांमधील समन्वय यांवर विशेष भर देण्यात येणार आहे.

परिवहन, आरोग्य आणि पोलीस विभागांचा समन्वय

हवाई रुग्णवाहिका सेवेसह अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी परिवहन विभाग, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी ट्रॉमा केअर सेंटरचे जाळे निश्चित करणे, सेवा पुरवठादारांचे पॅनेल तयार करणे, रस्ता सुरक्षा निधीतून आवश्यक आर्थिक तरतूद करणे आणि आपत्कालीन प्रतिसादासाठी प्रमाणित कार्यपद्धती विकसित करणे, अशा उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे.

अपघातातील प्रत्येक जीव अनमोल!

रस्ते अपघात रोखणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहेच; मात्र अपघात घडल्यानंतर जखमींना वेळेत उपचार मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि वेगवान आपत्कालीन वैद्यकीय सेवांच्या मदतीने रस्ते अपघातांतील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याच्या नियोजनामुळे महामार्गांवरील आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे.
‘अपघातग्रस्तांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत आणि केवळ मदत पोहोचण्यास झालेल्या विलंबामुळे कोणाचाही जीव जाऊ नये, यासाठी प्रभावी आणि सक्षम यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. प्रत्येक जीव अनमोल असून, अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,’ या भूमिकेतून हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याच्या नियोजनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES