₹5 लाख गुंतवा ₹28 कोटी मिळवा! 'इरिडियम'साठी तुम्हीसुद्धा पैसे गुंतवले असतील तर...; पोलिसांचं आवाहन
हा सारा प्रकार एक दोन नाही तर मागील आठ वर्षांपासून सुरु होता. भारतातील अनेकांसोबत हे घडलं आहे. आता पोलिसांनीच यासंदर्भात एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. नेमका हा प्रकार काय आहे जाणून घ्या सविस्तरपणे...
आतापर्यंत तुम्ही सोनं किंवा चांदीच्या नावाखाली फसवणूक झाल्याचं ऐकलं असेल किंवा वाचलं असेल. मात्र नवी मुंबईमधून एका अशा व्यक्तीला अटक करण्यात आली आहे ज्याने मौल्यवान धातू असल्याच्या नावाखाली इरिडियम या धातूच्या नावाने शेकडो लोकांना गंडा घातला आहे. या प्रकरणामध्ये नवी मुंबईतील कामोठेमधून 58 वर्षीय जयंत ओक या व्यक्तीला अटक केली आहे. त्याबरोबर जयंतचा कोलकात्यामधील साथीदार तुषार सेनगुप्ता या 48 वर्षीय व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. या दोघांनी मिळून देशातील 500 हून अधिक लोकांना लाखोंचे कोट्यवधी करुन देतो असं सांगत फसवल्याचं समोर आलं आहे.
पोलिसच ग्राहक बनून गेले
नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेमधील आर्थिक गुप्तवार्ता विभागाला काही इनपुट्स मिळाले होते. पोलिसांची परवानगी न घेता काहीजण गुंतवणुकीची योजना चालवत असून लाखोंमध्ये व्यवहार सुरु असल्याचं पोलिसांना समजलं. पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी प्लॅन आखला आणि ग्राहक म्हणून या टोळीचा कारभार समजून घेण्याचं ठरवलं. त्यानुसार नवी मुंबई पोलीस दलातील निरीक्षक सुरज गोरेंनी ग्राहक बनून जयंत ओकशी संपर्क साधला. सुरज हे इरिडियम खरेदी करण्यासाठी उत्सुक असल्याची खात्री पटल्यानंतर जयंतने त्याचा कोलकात्यामधील साथीदार तुषार सेनगुप्ताशी तुर्भ्यातील हॉटेल ली मेरेडियन येथे 13 ऑक्टोबरला भेट घालून दिली. पोलिसांना खरा धक्का पुढे बसला.
5 लाखांचे 28 कोटी...
मुख्य सूत्रधार असलेल्या तुषार सेनगुप्ताने ग्राहक बनून आलेल्या पोलिसांना पाच लाख रुपये गुंतवल्यास नोव्हेंबर महिना संपेपर्यंत 9 ते 28 कोटी रुपये परतावा देण्याचं आमिष दाखवलं. पोलिसांनी हा सारा संवाद छुप्या माईकच्या माध्यमातून पुरावा म्हणून रेकॉर्ड करुन घेतला. बरीच चर्चा झाल्यानंतर पोलिसांनी एक लाख रोख देण्याची तयारी दर्शवली आणि हे पैसे घेतानाच या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
सरकारी योजनेचा दावा
आरोपींकडून पैसे गुंतवण्यास उत्सुक असलेल्यांना तुषार सेनगुप्ता पश्चिम बंगाल-बांगलादेश सीमेवर इरिडियम सापडल्याचा दावा करायचा. तसेच हा इरिडियम धातू सरकारने जर्मनीला 3 लाख 34 हजार कोटींना विकला असून त्यामधील 50 टक्के रक्कम पाच कस्टोडियन्सला मिळणार असल्याचा दावा आरोपी करायचे. पण अशाप्रकारे या धातूची कस्टडी मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील म्हणूनच गुंतवणूकदारांकडून पैसे घेत असल्याचा सांगितलं जायचं. मात्र असा कोणताही धातू सापडलेला नसून सरकारची कोणतीही योजना नाहीये. हा सारा बनाव लोकांकडून अधिक परताव्याच्या नावाखाली पैसा उकळण्यासाठी वापरला जायचा.
पैसे घेतल्यानंतर आऊट ऑफ रिच
पोलिसांनी या दोघांना अटक करुन सखोल चौकशी केली असता अशाप्रकारे इरिडियमच्या नावाखाली सुरु असलेला फसवणुकीचा प्रकार मागील आठ वर्षांपासून म्हणजेच 2018 पासून सुरु असल्याचं समोर आलं. या दोघांनी वेगळ्या आणि मैल्यवान धातूच्या नावाखाली एक दोन नाही तर तब्बल 500 हून अधिक लोकांना गंडा घातला आहे. त्यांनी या लोकांकडून सरासरी चार ते पाच लाख रुपये घेतले आहेत. विशेष म्हणजे पैसे घेतल्यानंतर हे लोक समोरच्या व्यक्तीला भेटणं, त्याचा फोन घेणं टाळायचे. त्यांनी कोणालाही परतावा अथवा मूळ रक्कम परत केलेली नाही असं पोलिसांनी सांगितलं.
45 जण करायचे मदत
या दोघांबरोबरच देशभरामध्ये त्यांना मदत करणारे या रॅकेटमधले एजंट, लाभार्थी आणि मदतनीस असे 45 जण आहेत. आता पोलीस त्यांचा शोध घेत असून सध्या तरी ओके आणि सेनगुप्ता यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन मोबाईल, टॅबलेट पोलिसांनी जप्त केलाय. याप्रकरणी तुर्भे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुम्हीसुद्धा पैसे गुंतवले असतील तर...
विशेष म्हणजे या प्रकरणाचा आवाका आणि कालावधी पाहता अनेकजण फसवणूक होऊनही पुढे आले नसावेत असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळेच या योजनेत फसवणूक झालेल्या नागरिकांनी पुढे येण्याचं आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केलं आहे. नवी मुंबई आर्थिक गुप्तवार्ता कक्ष, गुन्हे शाखेकडे यासंदर्भात तक्रार नोंदवता येणार आहे. तसेच हेल्पलाइन 7700920766 या नंबरवर संपर्क साधूनही तक्रार नोंदवता येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
इरिडियम आहे काय? किंमत किती?
ज्या इरिडियमच्या नावाखाली या लोकांनी मागील आठ वर्ष सर्वसामान्यांना गंडा घातला ते इरिडियम म्हणजे दुर्मिळ, मौल्यवान धातू आहे. वैज्ञानिक भाषेत सांगायचं झालं तर घनतेचा विचार केल्यास हा ऑस्मियमनंतर पृथ्वीवरील दुसरा सर्वात जास्त घनता असलेला धातू आहे. इरिडियमची किंमत ₹25,394 ते ₹27,800 प्रति ग्रॅम आहे.