नोव्हेंबर सुरू पण गुलाबी थंडीची चाहुल कधी? हवामान विभागाने सांगितली तारीख
नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी अद्याप थंडीची चाहूल लागली नाही. आजही राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे.
दिवाळीत साधारणपणे थंडीला सुरुवात होती. मात्र यंदा मात्र दिवाळीत थंडीऐवजी तापमानाचा चटका वाढण्याचा अंदाज आहे. अर्णब आणि मुरासू चक्रीवादळामुळं राज्यातील हवामानात बदल झाले होते. त्यामुळं हवामानातही काहीसा गारवा होता. मात्र आजपासून हा पावसाचा प्रभाव कमी होणार असून पुन्हा उन्हाची काहिली वाढणार आहे. पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
एल निनोमुळं वातावरण बदलाचे संकट तीव्र होत आहे. यंदा पाऊसही कमी झाला आहे. त्यामुळं भयंकर दुष्काळाची स्थिती आहे. हिवाळ्यातही एल निनोचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे. नोव्हेंबर महिन्यातही देशभरात कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे. तर, चक्रीवादळामुळं आजही काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण कोकणातील काही भागांत हलक्या सरींची शक्यता असून, उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील दोन दिवसांत राज्यातील किमान तापमानात दोन ते चार अंशांनी घट होण्याचा अंदाज आहे. 9 नोव्हेंबरनंतर कमाल आणि किमान तापमानात घट होण्यास सुरुवात होणार आहे.
उत्तरेकडून कोरडे वारे वाहण्यास सुरुवात झाल्याने राज्यातील हवामानात बदल होणार आहे. काही दिवसांत मुंबईसह राज्यभरातील कमाल तापमानात सुरुवातीला वाढ होईल. मात्र 9 नोव्हेंबरनंतर थंडी जाणवायला सुरुवात होणार आहे. दिवसा उष्णता असली तरी रात्रीच्या वेळी हवेत काहीसा गारवा असेल, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
मुरासू चक्रीवादळ निवळणार
बंगालच्या उपसागरात तयार झालेले मुरासू चक्रीवादळ मंगळवारी पहाटे आंध्र प्रदेशच्या नेल्लोर आणि नरसापूर दरम्यान ओंगोलच्या जवळ जमिनीवर धडकले. वादळ जमिनीवर येताना 100 ते 110 किमी वेगाने वारे वाहण्याबरोबरच मुसळधार पाऊस कोसळला. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धुमाकूळ घातल्यानंतर 'मुरासु' हे तीव्र चक्रीवादळ आता तेलंगणाच्या दिशेने सरकले आहे. दिलासादायक बाब म्हणजे, या वादळाचा वेग ताशी 100 किलोमीटरवरून कमी होऊन ताशी 50 किलोमीटरपर्यंत घसरला आहे. त्यामुळे या चक्रीवादळाची तीव्रता हळूहळू ओसरू लागली आहे.