अमिताभ, अमिर खान निशाण्यावर! टायगर हल्ला प्रकरणात ट्विस्ट, सलमानच्या घराजवळही पोहोचलेले हल्लेखोर, पण...
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक खुलासे समोर येत आहेत. आता हल्लेखोरांचा टार्गेट टायगर नव्हताच हे समोर येत आहे.
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. राजस्थानच्या कोटा येथून आरोपींना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांना रस्तेमार्गे मुंबईत आणले गेले. तीन्ही आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. आरोपींचे पहिले टार्गेट टायगर श्रॉफ नव्हता, असे आता समोर आले आहे.
टायगर श्रॉफवर हल्ला करण्यापूर्वी तिन्ही आरोपींनी सलमान खानच्या घराची रेकी केली होती. त्यांचे पहिले टार्गेट अभिनेता सलमान खान होता. मुंबईत आल्यानंतर तिन्ही आरोपी पहिल्यांदा वांद्रे येथील बँन्डस्टँडमधील सलमानच्या घराजवळ पोहोचले होते. त्यांनी सलमानच्या घराचे रेकीदेखील केली होती.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींनी पहिल्यांदा सलमान खानला लक्ष्य केले होते. मुंबईत आल्यानंतर त्यांनी सलमानच्या घराची पाहणीदेखील केली होती. परंतु, घराबाहेर पोलीस तैनात असल्याचे पाहून त्यांनी त्यांचा प्लान बदलला. आरोपींना सलमान खानपर्यंत सहज पोहोचता न आल्याने त्यांनी टायगर श्रॉफवर हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
टायगर श्रॉफ आणि त्याच्या चाहत्यांच्या इंस्टाग्रामवरुन हल्लेखोरांनी रेकी करत टायगर श्रॉफचे दिवसभराचे शेड्युल कसे आहे हे तपासले. टायगर श्रॉफसोबत पोलीस बंदोबस्त नसतो हे त्याच्या चाहत्यांच्या रील्सवरून कळल्याने त्यांनी टायगरवर हल्ला करण्याचा प्लान केला. टायगर श्रॉफ दर रविवारी मुंबईतील जुहू येथे फुटबॉल खेळण्यासाठी जातो हे लक्षात अल्यावर त्यांनी तिथेच त्याच्यावर हल्ला करण्याचे ठरवले.
अमिताभ बच्चन, आमिर खानही टार्गेटवर
टायगरवरील हल्ल्याआधी आरोपींनी अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि अमीर खानच्या घराची रेकी केली होती. मात्र या अभिनेत्यांची सुरक्षा अधिक असल्याने त्यांनी प्लान बदलला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर, टायगर श्रॉफ टार्गेट नव्हताच, असंही समोर येतेय.
सलमान खानच्या सुरक्षेत वाढ
टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान 2024मध्ये सलमान खानच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबारानंतर त्याला मुंबई पोलिसांकडून वाय-प्लस सुरक्षा पुरवली जाते. ज्याअंतर्गंत त्याच्या घराबाहेर 24 तास पोलीस तैनात असतात. तसंच, तो जिथे जातो तिथे जीपमधून सशस्त्र पोलीस त्याच्यासोबत असतात.
तसंच, सलमान जिथे भेट देणार असेल त्या ठिकाणांची स्थानिक पोलिस पथकांकडून तपासणी केली जाते. तसंच, त्याच्यासोबत असलेल्या सुरक्षा पथकांव्यतिरिक्त, तो भेट देत असलेल्या ठिकाणी अतिरिक्त कर्मचारीही तैनात केले जातात. आता त्याच्या अपार्टमेंटजवळ बॅरिकेड्स उभारून त्याची सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे.