मोठा खुलासा! टायगरवर हल्ला करण्यासाठी आरोपींना किती रुपयांची सुपारी देण्यात आलेली? समोर आली रक्कम; परदेशात सेटल होण्याची ऑफर
टायगर श्रॉफवर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी कोटा येथून तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र आता या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तीनही गुन्हेगारांना टायगर श्रॉफवर हल्ला करण्यासाठी 35,000 रुपयांची सुपारी देण्यात आली होती, अशी माहिती समोर येत आहे.
मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांना 35,000 रुपये मिळणार होते. हे पैसे काम पूर्ण झाल्यावर दिले जाणार होते. मात्र त्याआधीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आता अटक केलेल्या हल्लेखोरांची चौकशी सुरू असून आणि या प्रकरणात नवीन खुलासेही होत आहेत. सूत्रांनुसार, आणखी बरेच लोक रडारवर येण्याची शक्यता आहे. तसंच, काही दिवसांत आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, तपास अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, तीन आरोपींपैकी एक असलेल्या रेहान उर्फ सुक्का याला कथितरित्या 35,000 रुपये आणि परदेशात स्थायिक होण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, रेहानवर यापूर्वी शस्त्र कायद्यांतर्गत आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपी सुमारे महिनाभर मुंबईत राहत होते. याच काळात त्यांची ओळख हृतिक कुमारशी करून देण्यात आली, ज्याला शहरातील रस्त्यांची चांगली माहिती होती. कुमारलादेखील परदेशात चांगल्या नोकरीचे आमिष दाखवूनही फसवण्यात आले होते, असे म्हटले जाते.
दरम्यान, टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी हरियाणा पोलिसांनाही एकाला अटक केली आहे. पोलिसांनी हल्लामागील संशयित सूत्रधार अनिल पंडितच्या एका कथित साथीदाराला ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी आणि अनिल पंडित यांची ऑनलाइन बैठकदेखील झाली होती. त्यानंतर हरियाणातील साथीदाराच्या मदतीने तीनही शूटर्सची भरती करण्यात आली. त्यासाठी त्यांना पैसे आणि परदेशात स्थायिक करण्याचे प्रलोभन देण्यात आले होते.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनिल पंडित यांने तिघांच्या खर्चासाठी परदेशातून ऑनलाइन पैसे पाठवले होते. तसंच, तिघा आरोपींना जग्गी अॅपद्वारे निर्देश देण्यात येत होते. यात वापरकर्त्यांची ओळख न दाखवता संभाषण करता येत नव्हते.
कोटामधून आरोपींना अटक
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात फरार असलेल्या तीन आरोपींना राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली आहे. राजस्थान पोलिसांच्या अँटी-गँगस्टर टास्क फोर्सने (ATF) ही कारवाई केली. मुंबईहून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेगाडीतून प्रवास करत असताना या तिघांना कोटा रेल्वे स्थानकावर ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.