टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट! ट्रान्झिट रिमांडमध्ये आरोपींसोबत...आरोपींच्या वकिलाचा आरोप तर मोबाईल फोनबद्दल पोलिसांची कोर्टात मोठी अपडेट
टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात तिन्ही आरोपींना मुंबईच्या किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कोर्टात सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलाने मोठा आरोप केला आहे.
अभिनेता टायगर श्रॉफच्या गोळीबार प्रकरणात आज तिन्ही आरोपींना मुंबईतील किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कोर्टात आरोपींसाठी 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. यावेळी कोर्टाने तिन्ही आरोपींना 31 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोर्टात पोलिसांनी आणि आरोपींच्या वकिलाने महत्त्वाचे अपडेट दिले आहेत. टायगर श्रॉफवर गोळीबार केल्यानंतर आरोपींनी आपले मोबाईल फोनसह हत्यारही नष्ट केले आहेत.
पोलिसांनी कोर्टात काय सांगितलं?
पोलिसांनी 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करताना कोर्टात सांगितलं की, या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सूत्रधार अनिल पंडित याचं नाव समोर आलंय. त्यामुळे या गु्न्ह्याची व्याप्ती फार मोठी आहे. या आरोपींविरोधात शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कोर्टात हेही सांगितलं की, टायगर श्रॉफवरील हल्ल्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग असल्याने आरोपींना पोलीस कोठडी द्या. पोलिसांनी सर्वात मोठी अपडेट दिली आहे की, या तिघांसोबत आणखी पाच आरोपींना अटक केली आहे.
सरकारी वकिलाने सांगितलं की, अटकेत असलेले तिघेही आरोपी हे नोंदणीकृत गुन्हेगार आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून आणि त्यांच्या बाईकचा माग काढल्यानंतर आरोपींना अटक केली गेली आहे.
कोर्टात आरोपीच्या वकिलाने काय युक्तीवाद केला?
आरोपीच्या वकिलाने कोर्टात युक्तीवाद करताना म्हटलं की, हे तिघही निर्दोष आहेत. त्यांचा काहीही संबंध नसून त्यांना पोलीस कोठडीची गरज नाही. या तिघांचा कोणत्याही प्रकारच्या षडयंत्रात सहभाग नाही. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचे वर्णन करण्यात येतं आहे. तर तिघांना केवळ संशयावरूनच अटक झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे आरोपींची 48 तासांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या तिघांची रात्रभर चौकशी करण्यात आली आहे. तसंच प्रवासादरम्यान मध्येच थांबून रेल्वे क्वाटर्समध्येही तिघांची चौकशी करण्यात आल्याचा आरोप वकिलाने केला आहे. कोर्टात वकिलाने असा प्रश्न उपस्थितीत केला की, ट्रान्झिट रिमांडमध्ये चौकशी करू शकत नाहीत मग चौकशी कशी काय केली.