फॅन म्हणून गर्दीत वावर, गेल्या आठवड्यातच होणार होता हल्ला, पण टायगरच्या एका निर्णयामुळं मोठा अनर्थ टळला!
टायगर श्रॉफवर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात आत्तापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे करण्यात येत आहेत. पोलिसांच्या सूत्रांनुसार, 18 ऑक्टोबर रोजी पहिल्यांदाच टायगरवर हल्ला करण्यात आला नव्हता तर याआधीही त्याच्यावर हल्ला करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. तसंच, टायगर श्रॉफला जीवे मारण्याचा हल्लेखोरांचा कट होता. मात्र आरोपीच्या एका चुकीमुळं टायगर थोडक्यात बचावला आहे.
पोलिसांच्या सूत्रांनुसार, 18 ऑक्टोबर रोजी टायगर श्रॉफवर झालेला हल्ला हा पहिला प्रयत्न नव्हता; या हल्ल्याच्या एक आठवडा आधी 11 ऑक्टोबर रोजी टायगर श्रॉफला लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला होता. 11 ऑक्टोबर हा देखील रविवार होता. पोलिसांच्या सूत्रांनुसार, तिन्ही आरोपींनी 11 ऑक्टोबर रोजी जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमधील फुटबॉल मैदानावरही भेट दिली होती.
पोलिसांना संशय आहे की, आरोपींनी त्या दिवशी टायगर श्रॉफला लक्ष्य करण्याची योजना आखली होती. परंतु टायगर फुटबॉल खेळायला आला नाही, त्यामुळे आरोपी पुन्हा परतले. टायगर नियमितपणे रविवारी संध्याकाळी 5 ते 7 च्या दरम्यान पुष्पा नरसी फुटबॉल मैदानावर जात असे. तो रविवारी फुटबॉल खेळणे क्वचितच चुकवत असे.
18 ऑक्टोबर रोजी, आरोपी पुन्हा फुटबॉल मैदानाबाहेर दिसले होते. ते संध्याकाळी सुमारे 4.30 पासून पुष्पा नरसी पार्कच्या गेटजवळ घुटमळत होते. ११ ऑक्टोबर रोजी झालेल्या कथित पाहणीचा आणि 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या गोळीबाराचा संबंध पोलीस सध्या तपासत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल रेकॉर्ड्स आणि आरोपींच्या हालचालींची तपासणी करून या हल्ल्यात आणखी कोण सहभागी होते, याचा तपास सुरू आहे.
20 दिवसांपासून रेकी
गेल्या दीड महिन्यापासून टायगरच्या हल्ल्याचा कट शिजत होता. शूटर आरोपी 20 दिवसांपासून मुंबईत होते. त्याच्या हालचालींची माहिती घेण्यास सुरुवात केली. चाहत्यांच्या गर्दीत मिसळून त्याच्या येण्या-जाण्यावर लक्ष ठेवण्यात आले. घर ते व्यायामशाळा आणि इतर ठिकाणी जाण्याच्या वेळा, त्याचे दैनंदिन वेळापत्रकाचा मागोवा घेतला.