आधी स्वत: गुटखा खा, तुमच्या मुलांना सवय लावा आणि मग...; तुकाराम मुंढेंनी सेलिब्रिटींना थेट सुनावलं
महाराष्ट्र एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 11 ऑगस्ट 2026 रोजी शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना पानमसाल्याच्या जाहिरातीबाबत कारणे दाखवा नोटीस पाठवली होती.
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मे महिन्यामध्ये कारभार हाती घेतल्यापासून कारवाईचा धडका सुरु आहे. औषधांपासून ते अन्न पदार्थांपर्यंत आणि सौंदर्य प्रसाधनांपासून ते हॉटेल, रेस्टारंटमधील स्वच्छता निकषांपर्यंत अनेक विषयांसंदर्भात मुंढेंच्या नेतृत्वाखाली कठोर कारवाई केली जात आहे. केवळ सर्वसामान्य नाही तर अनेक अती महत्त्वाचे लोकही मुंढेंच्या रडारवर आहेत. पानमसाला आणि गुटख्याची जाहीर करणाऱ्यांना मुंढेंनी नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये सुनावलं आहे.
मुंढेंची कठोर भूमिका
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान, टायगर श्रॉफ आणि अजय देवगण यांना मुंढेंच्या अन्न व औषध प्रशासनाने पानमसाल्याची जाहिरात केल्या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. ही जाहीरात मागे घेण्यासंदर्भातही कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. याचसंदर्भात एका मुलाखतीमध्ये मुंढेंनी कठोर भूमिका घेतल्याचं दिसून आलं. या कलाकारांना पाठवलेल्या नोटीससंदर्भात बोलताना मुंढेंनी, आपल्याला वैयक्तिक स्तरावर दुटप्पी भूमिका आवडत नाही असं सांगितलं.
दुटप्पीपणा आवडत नाही
"दुटप्पीपणा आणि दोन भूमिका घेणारे लोक मला आवडत नाहीत. मला कोणाचीही चमचेगिरी करायला अजिबात आवडत नाही. वैयक्तिक जीवनात एक आणि व्यावसायिक जीवनात वेगळी भूमिका असू शकत नाही. मला एक कळते की, जर कोणी जाहीरपणे सांगत असेल की एखादे उत्पादन चांगले आहे तर तोच नियम हा उत्पादनाला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींनाही लागू होतो," असं स्पष्ट मत मुंढेंनी मांडलं.
तुम्ही खा, मुलांना सवय लावा आणि मग...
याच भूमिकेला अनुसरुन पानमसाल्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर निशाणा साधताना मुंढेंनी, "जर तुम्ही पान किंवा गुटख्याची जाहिरात करत असाल तर आधी तुम्ही स्वत: त्याचे सेवन करा. हे तुम्ही केले पाहिजे. तुमच्या मुलांना त्याची सवय लावा. त्यांना सेवन करू द्या. मग त्याची सवय इतरांना लावा. कोणतीही जाहिरात करणे म्हणजे त्या उत्पादनाला आपला चेहरा देणे नव्हे. जे कोणी लोक जाहिरात करत आहेत, त्यांची ती जबाबदारी असते की जनतेने काय करावे आणि कशावर त्यांनी विश्वास ठेवावा," असं म्हटलं.
तुमच्यासाठी ते स्टार असतील, पण माझ्यासाठी...
एफएसएसएआयच्या नियमांनुसार एखाद्या गोष्टीची जाहिरात करणाऱ्यावरही (एंडोर्सर) काही जबाबदारी येते. भ्रामक जाहिरातीसाठी 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. सेलिब्रिटींना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोपही यासंदर्भात बोलताना मुंढेंनी यापूर्वीच फेटाळल्याचं दिसून आलेलं. तुकाराम मुंढे यांनी याबाबत बोलताना, “तुमच्यासाठी ते स्टार असतील, पण माझ्यासाठी ते कायदा तोडणारे आहेत,” असं म्हटलेलं. मी कोणालाही टार्गेट केलेले नाही, तर मी केवळ कायद्याची अंमलबजावणी केली आहे, असं मुंढेंनी सांगितलेलं.