मुंबईवरुन ‘या’ मार्गावर धावणार स्लीपर वंदे भारत; प्रवासाचे 8 तास वाचणार! पाहा Timetable, तिकीट दर, स्टेशन्सची यादी
वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच मुंबईमधून धावणार आहे. ही ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार? कोणत्या दिवशी आणि किती वाजता धावणार? या ट्रेनमुळे नक्की कोणाला आणि कसा फायदा होणार? जाणून घ्या यासंदर्भात सविस्तर माहिती एकाच ठिकाणी...
मुंबईहून सुटणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी धावणार? किती आणि कोणते थांबे तिला असणार? यासंदर्भातील सर्व माहिती समोर आली आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेन मुंबई ते बंगळूरू या मार्गावर चालवली जाणार आहे. रेल्वे बोर्ड लवकरच एसएमव्हीटी बंगळूरु-मुंबई सीएसएमटी वंदे भारत स्लीपर ट्रेनची अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. याच महिन्यामध्ये म्हणजेच दिवाळीपूर्वी ऑक्टोबरमध्ये या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाऊ शकतो. या ट्रेनच्या माध्यमातून भारताच्या आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या राजधानीची शहरं अधिक जवळ येतील. या दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ या स्लीपर वंदे भारतमुळे कमी होणार आहे.
नेमका किती वेळ वाचणार?
गेल्या तीन दशकांपासून प्रवासी मुंबई आणि बंगळूरु दरम्यान सुपरफास्ट रेल्वे सेवेची मागणी करत आहेत. या ट्रेनच्या सुरू होण्यामुळे केवळ बिझनेस क्लासच्या प्रवाशांनाच नव्हे, तर सामान्य प्रवासी आणि पर्यटकांनाही आधुनिक आणि आरामदायक स्लीपर प्रवासाचा अनुभव मिळेल, असे सांगितले जात आहे. ही वंदे भारत स्लीपर ट्रेन रात्रीचा प्रवास अधिक वेगवान आणि आधुनिक बनवेल. सध्या मुंबई-बंगळुरु या दोन शहरांदरम्यान उद्यान एक्सप्रेस ही एकमेव दैनंदिन थेट धावणारी ट्रेन आहे. मुंबई, सीएसएमटी (CSMT) ते बंगळुरू, केएसआर (KSR) दरम्यान धावणारी वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे या दोन शहरांतील प्रवास 16 तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करेल. उद्यान एक्सप्रेसला मुंबई-बंगळुरु अंतर कापायला सरासरी 24 तास लागतात.
किती दिवस धावणार?
भारतीय रेल्वेची ही फ्लॅगशिप प्रिमियम ट्रेन मुंबई ते बंगळुरू या मार्गावर आठवड्यातून सहा दिवस दोन्ही दिशांना धावेल, असं सांगण्यात येत आहे. ही ट्रेन मुंबईहून मंगळवार वगळता सर्व दिवस धावेल. तर बंगळुरू येथून ही ट्रेन सोमवार वगळता सर्व दिवस सुटेल. यामध्ये एकूण 16 एसी डबे असतील.
कधी सुटणार?
प्रस्तावित वेळापत्रकानुसार, मुंबईहून निघणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन रात्री 10.30 वाजता सुटेल. यानंतर वाडी, धर्मावरम या मार्गे दुसऱ्या दिवशी दुपारी 2.50 वाजता बंगळुरू येथे पोहोचेल. तसेच बंगळूरु येथून मुंबईकडे येणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन रात्री 10 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 1.50 वाजता मुंबईत पोहचणं अपेक्षित आहे.
कोणत्या स्थानकांवर थांबणार? तिकीट किती?
स्लीपर वंदे भारत ट्रेन मुंबई ते बंगळुरू या मार्गादरम्यान कल्याण, पुणे, सोलापूर, कलबुर्गी, रायचूर, गुंटकल, अनंतपूर या स्थानकांवर थांबणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनची रचना अत्यंत आधुनिक असणार आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनचं तिकीट राजधानी एक्सप्रेसपेक्षा सुमारे 20 टक्के जास्त असण्याची शक्यता आहे.
थर्ड एसी: प्रति किलोमीटर अंदाजे ₹2.49 (जीएसटी अतिरिक्त)
सेकेंड एसी: प्रति किलोमीटर अंदाजे ₹3.10 (जीएसटी अतिरिक्त)
फर्स्ट एसी: प्रति किलोमीटर अंदाजे ₹3.80 (जीएसटी अतिरिक्त)
कोणते डबे कसे असणार? किती प्रवासी प्रवास करु शकतात?
या ट्रेनमध्ये 823 प्रवाशांसाठी बसण्याची आणि झोपण्याची सोय असेल. ट्रेनच्या रेकची प्राथमिक देखभाल केएसआर किंवा एसएमव्हीटी बंगळूरु येथेही केली जाऊ शकते. या वंदे भारत स्लीपर ट्रेनमधील 16 पैकी 11 कोच हे 3 एसी, 4 कोच 2 एसी आणि एक कोच 1 एसी डब्याचा असेल.