आता लक्ष 12 नोव्हेंबरकडे कारण... 'या' ठिकाणी तर कसर भरल्यानंतरही धो-धो कोसळणार; हवामान खात्याकडून Good News
महाराष्ट्रामधील 300 हून अधिक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला असतानाच आता हवामान खात्याने दिलासा देणारा एक अत्यंत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. नेमकं काय म्हटलंय हवामान विभागाने जाणून घ्या सविस्तर...
राज्यात ऑक्टोबर हिटचा कहर जाणवत असतानाच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. परतीच्या वाटेवर असलेला मान्सून महाराष्ट्राच्या काही भागांत पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने थेट तारखांसंहीत यासंदर्भातील अंदाज व्यक्त करताना नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात...
हा अंदाज काय? तारखा कोणत्या?
15 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीसाठी वर्तवलेल्या विस्तारित हवामान अंदाजानुसार, कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागांमध्ये पुढील महिन्याभरात पावसाची दाट शक्यता आहे. मात्र, पावसाचे नेमके ठिकाण आणि त्याची तीव्रता याबाबत हवामान विभागाच्या पुढील अंदाजावर लक्ष ठेवावे लागणार आहे.
अचानक का पडणार पाऊस?
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 15 ते 18 ऑक्टोबरदरम्यान दक्षिण भारतातील काही भागांत पावसाची शक्यता आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात हवामान प्रणाली विकसित होण्याचे संकेत मिळत असल्याने या अंदाजाला महत्त्व प्राप्त झाले आहे. 18 ऑक्टोबरच्या आसपास पावसाची प्रणाली उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असून, त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांतही पाऊस पडू शकतो. हवामान विभागाच्या चार आठवड्यांच्या अंदाजानुसार, पहिल्या आठवड्यात म्हणजे 15 ते 22 ऑक्टोबरदरम्यान दक्षिण भारतात पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात ईशान्य मोसमी पावसालाही सुरुवात झाली आहे.
इथं धो धो कोसळणार
22 ते 29 ऑक्टोबरदरम्यान सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे असून तो कुठे पडू शकतो याचं ठिकाणी वर्तवण्यात आलं आहे. सरासरीपेक्षा अधिक पाऊस केरळ आणि तामिळनाडूमध्ये पडण्याची शक्यता आहे. याशिवाय कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या काही अन्य भागांतही पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. तिसऱ्या आठवड्यात म्हणजे 29 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरदरम्यान दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्या अनेक भागांत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
किती पाऊस पडणार हे 'या' घटकावर अवलंबून
देशातील एका मोसमी पावसाचा हंगाम संपला असला, तरी दक्षिण भारतासह काही भागांत पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने 15 ऑक्टोबर रोजी दिलेल्या माहितीनुसार, नैर्ऋत्य मोसमी पावसाने संपूर्ण देशातून माघार घेतली आहे. दक्षिण भारताच्या आग्नेय द्वीपकल्पीय भागात ईशान्य मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाचा हा अंदाज विस्तारित कालावधीसाठी असल्याने किती पाऊस पडेल, हे हवामान प्रणालीची स्थिती आणि तिच्या हालचालींवर अवलंबून असल्याचं हवामान खात्याकडून सूचित करण्यात आलं आहे.