SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

यंदा उन्हाळा 8 महिन्यांचा, गुलाबी थंडीचे दिवस गायब होणार; हवामानात होणार भयानक बदल

प्रशांत महासागरात एल निनो (El Niño) अधिक बळावल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात आली आहे. एल निनोमुळं ऋतुबदल होण्याची दाट शक्यता निर्माण होणार आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 01, 2026, 02:23 PM IST | Updated: Oct 01, 2026, 02:27 PM IST
Image Credit: El Niño is set
Join

एल निनोचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती ओढावली आहे. एल निनोमुळं यंदाच्या हंगामात पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला आहे. महाराष्ट्रात पावसाची तूट नोंदवली आहे. जून, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाची मोठी तूट नोंदवली होती. फक्त जुलै महिन्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. अपुऱ्या पावसामुळं मराठवाडासह विदर्भात दुष्काळ स्थिती नोंदवली आहे. एल निनोमुळं हवामानातही बदल झाले आहेत. पावसाळा संपल्यानंतर आता हिवाळ्याची चाहुल सुरू होते. मात्र यंदा हिवाळ्यातही उन्हाचे चटके जाणवणार आहेत. येणारा उन्हाळा अत्यंत तीव्र राहणार आहे आणि 2027पर्यंत याचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हाळा जीव काढणार असून, पाणीसाठा घटल्याने पाण्यासह आरोग्याचा गंभीर प्रश्नही निर्माण होणार आहे.

सरासरीपेक्षा कमी पावसाची टक्केवारी ही खूप अधिक म्हणजेच 70 टक्के होती. त्यामुळे सर्वसाधारणपणे कशा प्रकारचा पाऊस पडेल, याची पूर्वकल्पना होती. आकडेवारी पाहता ती उणे 19 टक्के आहे. ती हवामान विभागाच्या परिभाषेनुसार उणे 19 ते अधिक 19 च्या दरम्यान सर्वसाधारण (नॉर्मल) मानली जाते. काठावर असलेला हा सरासरी पाऊस किंवा त्यात होणारी उणे अधिक तफावत फारसा परिणाम करणारी नसली, तरी मराठवाड्यातील बहुतेक जिल्हे, विदर्भातील जिल्हे आणि नंदुरबारसह कोकणातील सिंधुदुर्गमध्येही कमी पाऊस पडला आहे.

जूनमध्ये पावसाने ओढ दिली आणि सरासरीपेक्षा 40 टक्के पाऊस कमी झाला. एल निनोचा प्रभाव कारणीभूत होता किंवा नाही हे सांगणे कठीण असले तरी, त्याचा प्रभाव नंतर ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये जाणवू लागला. जुलैमध्ये जूनच्या विपरीत असा 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे बऱ्याच जणांना एल निनो संपल्याचे वाटले होते, परंतु ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पावसाकडे पाहता एल निनोचा वातावरणावरील परिणाम हवामानामध्ये स्पष्ट दिसत आहे.

हवामान बदलाच्या आणि एल निनोच्या दीर्घकालीन परिणामांमुळे येणारा उन्हाळा अत्यंत तीव्र असणार असून, 2027 च्या उन्हाळ्यापर्यंत याचा प्रभाव जगभरात आणि प्रामुख्याने आपल्या देशावर व राज्यावर कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे उन्हाळ्यातील तापमान सरासरीपेक्षा खूप अधिक राहणार असून, तीव्र उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील पेटणार आहे. अल निनोचा प्रभाव आणि अपुऱ्या पावसामुळे यंदा उन्हाळ्याची तीव्रता तब्बल 7 ते 8 महिने राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, यंदा हिवाळा अतिशय सौम्य असेल किंवा थंडीचा कालावधी अत्यंत कमी जाणवेल, ज्यामुळे ऑक्टोबरच्या उष्णतेनंतर थेट उन्हाळ्यासारखी परिस्थिती कायम राहू शकते.

पावसाच्या लहरीपणाचा आणि तुटीचा थेट परिणाम जलसाठ्यांवर झाला असून, राज्यातील बहुतांश धरणांमध्ये जुलै महिन्यात पाणीसाठा असला तरी ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील तुटीमुळे धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. प्रशासनाला आता केवळ पिण्याच्या पाण्याचे नियोजन करून चालणार नाही, तर रब्बी पिकांची लागवड करताना कृषी विभागाच्या सल्ल्याने कठोर नियोजन करणे गरजेचे ठरणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES