महाराष्ट्रातील 'या' गावात करतात रावणाची पूजा; 350 वर्षांपूर्वी मूर्तीकाराच्या हातून झाली होती मोठी चूक
अकोल्यातील सांगोळा गावात रावणाची पूजा केली जाते. या गावेन 350 वर्षांची अनोखी परंपरा आजही कायम जपली आहे.
अकोला : एकीकडे विजयादशमीच्या दिवशी देशभरात रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जात असताना, दुसरीकडे अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात मात्र रावणाची पूजा केली जाते. या गावात रावणाच्या मूर्तीची पूजा करण्याची परंपरा सुमारे साडेतीनशे वर्षांपासून सुरू असल्याचे सांगितले जाते. रावणाच्या या मूर्तीमागेही एक रंजक इतिहास आहे.
सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी या गावात एक ऋषीमुनी वास्तव्यास होते. गावातील वडाच्या झाडाखाली बसून ते तपस्या करत असत. त्यांच्या निधनानंतर गावकऱ्यांनी त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी वडाच्या झाडाखाली बसलेल्या ऋषीमुनींची मूर्ती तयार करण्याचे ठरवले. त्यासाठी एका मूर्तिकाराला मूर्ती बनवण्याची जबाबदारी देण्यात आली. मात्र, गावकऱ्यांनी ऋषीमुनींच्या मूर्तीसाठी सांगितले असताना मूर्तिकाराने चक्क रावणाची मूर्ती तयार केली. त्यानंतर गावकऱ्यांनीही जे घडले ते स्वीकारत या मूर्तीची गावात स्थापना केली.
तेव्हापासून सांगोळा गावात रावणाच्या या मूर्तीची नियमित पूजा केली जात असल्याचे सांगितले जाते. आजही दसऱ्याच्या दिवशी देशभरात रावणदहनाची परंपरा पाळली जात असताना, सांगोळा गावात मात्र रावणाची पूजा करून ही ऐतिहासिक परंपरा जपली जाते. त्यामुळे रावणाच्या दहनाऐवजी त्याची पूजा करणारे सांगोळा गाव विजयादशमीच्या दिवशी आपल्या अनोख्या परंपरेमुळे चर्चेत येते.
विजयादशमी निमित्ताने विठोबाला सोन्याची पगडी आणि सोन्याचे पितांबर
श्री विठ्ठलास सोन्याची पगडी, कौस्तुभ मणी, दंडपेट्या जोड, हिऱ्याचे कंगनजोड, नामनिळाचा, नवरत्नाचा हार, मोरमंडळी, मोत्याचा तुरा, चांदीची काठी, सोन्याचे घोंगडे, सोन्याचे पितांबर, मोत्याची कंठी, हिऱ्याचे पैंजण तोडे, जवेची माळ, तुळशीची माळ, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, मोठी बोरमाळ इ. अलंकार परिधान करण्यात आलेली आहेत.
रुक्मिणी मातेस जडावाचे मुकुट, जडावाचे बाजूबंद, खड्यांची वेणी, चिंचपेटी हिरवी, हातसर जोड, पाण्याडयाचा हार, तनमणी मोठा, कोल्हापुरी साज, दशावतारी साज, सोन्याची साडी, ठुशी, मास पट्टा, शिंदे हार, जडावाचे ताणवड, चंद्र, सूर्य, बाजीराव गरसोळी, पेठयांची बिंदी, खड्यांच्या पाटल्या, मोत्याचे बाजूबंद, मत्स्य, रूळ जोड, पैंजण जोड, मोठी नथ, कर्णफुले, सोन्याचा करंडा, छत्रछामर, तोडे जोड, तारा मंडळ, चंद्रहार इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.