डीआरआयच्या दोन मोठ्या कारवाया! महिलेला 1.5 कोटींच्या अमली पदार्थांसह अटक, तर दुसऱ्या कारवाईत तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) मुंबई झोनच्या नागपूर प्रादेशिक युनिटने गुप्तचर माहितीच्या आधारे दोन मोठ्या कारवाया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) मुंबई झोनच्या नागपूर प्रादेशिक युनिटने गुप्तचर माहितीच्या आधारे दोन मोठ्या कारवाया यशस्वीपणे पार पाडल्या असून, तीन दिवसांच्या कालावधीत एका आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करी टोळीचा आणि एका वन्यजीव तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे.
पहिल्या कारवाईत 27 सप्टेंबर 2026 रोजी डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे सुरक्षा बल (RPF) मध्य रेल्वे, नागपूर यांच्या मदतीने हजरत निजामुद्दीन - केएसआर बेंगळुरू राजधानी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका भारतीय महिला नागरिकाला नागपूर रेल्वे स्थानकावर अडवले. तिच्या सामानाची सविस्तर तपासणी केली असता तिच्या सुटकेसच्या आतील कापडी अस्तराच्या मागे तयार केलेला एक गुप्त पुठ्ठ्याचा कप्पा आढळून आला. अधिकाऱ्यांनी निळ्या रंगाच्या कार्बन पेपरमध्ये गुंडाळलेले दोन पाकिटे जप्त केली, ज्याची फिल्ड ड्रग टेस्टिंग किटद्वारे तपासणी केली असता ते अॅम्फेटामाइन असल्याचे निष्पन्न झाले. जप्त केलेल्या 1.312 किलो अॅम्फेटामाइनची अवैध बाजारातील किंमत सुमारे 1.05 कोटी रुपये आहे. प्रवासी महिलेला NDPS कायदा, १९८५ च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली.
दुसऱ्या कारवाईत 29सप्टेंबर 2026रोजी डीआरआय नागपूर प्रादेशिक युनिटने महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील पुराडा गावाजवळ एका बेकायदेशीर वन्यजीव तस्करी टोळीला अडवून तिचा पर्दाफाश केला. अधिकाऱ्यांनी बिबट्याची (Panthera pardus) कातडी जप्त केली आणि त्याच्या बेकायदेशीर व्यापारात सामील असलेल्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतले. बिबट्या हा वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या परिशिष्ट-१ मध्ये समाविष्ट असल्याने, जप्त केलेली कातडी आणि ताब्यात घेतलेल्या दोन व्यक्तींना पुढील आवश्यक कारवाईसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी, उत्तर देवरी परिक्षेत्र, गोंदिया यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. उज्जैन येथे बिबट्याची कातडी, सिवनी येथे वाघाची हाडे, पिलेरू आणि जगदलपूर येथे खवल्या मांजराचे खवले आणि म्हैसूर येथे हत्तीचे हस्तिदंत जप्त करणे यासह देशभरात डीआरआय नागपूरने केलेल्या यशस्वी वन्यजीव अंमलबजावणी कारवायांच्या मालिकेतील ही एक कारवाई आहे.