जळगावात बेपत्ता झालेल्या डॉक्टर संजय तेली प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट, मृतदेह सापडल्याने खळबळ, गोणीत बांधून...
जळगावात दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेले डॉक्टर संजय तेली यांची हत्या करण्यात आली आहे.
जळगावच्या पाचोरा तालुक्यातील गोरडखेडा येथून बेपत्ता झालेल्या डॉक्टर संजय तेली प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. डॉक्टर संजय तेली यांची हत्या झाल्याचं उघड झालं आहे. सोमवारी सकाळी बहुळा धरण त्यांच्या मृतदेह सापडला आहे. गोणीत बांधून त्यांचा मृतदेह पाण्यात फेकण्यात आला होता. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढला असून, शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. जमिनीच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
डॉ. संजय तेली हे कन्नड येथे वास्तव्यास होते. 18 नोव्हेंबर रोजी एक कोटी 25 लाख रुपयांच्या जमिनीच्या व्यवहारासाठी डॉक्टर तेली गोरडखेडा येथे आले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. पाचोरा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास सुरु केला असता मोबाइलचे शेवटचे लोकेशन गोरडखेडा येथे मिळाले होते. तसेच त्यांची कारही परिसरात आढळली होती.
पोलिसांनी संशयावरून राहुल धर्मराज पाटील याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने हत्येची कबुली दिल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सालदार संजय भील याने मदत केल्याचेही तपासात समोर आले.
घटनेनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह पोत्यात भरून बहुळा धरणात फेकला होता. यानंतर बहुळा धरणात रविवारी दुपारपासून मृतदेहाचे शोध कार्य होते, रात्र झाल्यामुळे सकाळी होणार पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. यानंतर त्यांचा मृतदेह सापडला आहे.
याप्रकरणी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीला जमिनीच्या व्यवहारापोटी 80 लाख रुपये दिले होते, अशी माहिती डॉक्टर तेली यांच्या कुटुंबीयांनी दिली. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही कुटुंबीयांनी केली आहे. पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहेत