FDA मधील 5 बडे अधिकारी सस्पेंड! तुकाराम मुंढेंकडे केस आली अन्...; 252000 KG सुपारीमुळे गेली सरकारी नोकरी, तपासात काय समोर आलं?
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एफडीए आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कामाचा धडका सुरु केला असून त्यांनी पहिल्यांदाच पाच अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. नेमकं या अधिकाऱ्यांनी काय केलं होतं? जाणून घ्या सविस्तरपणे...
राज्याचे अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी आपल्याच विभागातील अधिकाऱ्यांना दणका दिला आहे. एफडीएमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखवण्याची मोहीम मुंढेंनी हाती घेतली आहे. याच मोहिमेअंतर्गत सहआयुक्त दर्जाच्या नाशिकच्या पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांनी 252 मेट्रिक टन (252000 किलो) निकृष्ट सुपारी नष्ट केल्याचे खोटे पंचनामे करून ती सुपारी पुन्हा बाजारात विक्रीस आणल्याचा आरोप आहे. या प्रकरणामध्ये मुंढेंनी या सर्वांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
मुंढेंकडे नोंदवली तक्रार
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे निकृष्ट सुपारी अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये जप्त केली होती. ही सुपारी खाण्यासाठी धोकादायक असल्याने ती नष्ट करावी, असे आदेश न्यायालयाने मार्च 2025 मध्ये विभागाला दिले होते. मात्र हा साठा जाळून टाकल्याचे खोटे पंचनामे तयार केल्याचा आरोप पाच अधिकाऱ्यांवर आहे. याबाबत तक्रार आल्यानंतर आयुक्त मुंढे यांनी या प्रकरणाची माहिती मागवून घेतली.
मुंढेंनी कसा पकडला हा सारा प्रकार?
अधिकाऱ्यांनी 11 ट्रकचा वापर करून ही निकृष्ट सुपारी असलेला साठा जाळून नष्ट केल्याचा उल्लेख करण्यात आला होता. एका ट्रकमध्ये सुमारे 4 टन याप्रमाणे 11 ट्रकची क्षमता 44 टन सुपारी वाहून नेण्याची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर विधि विभागाच्या समितीने केलेल्या चौकशीत एकाच ट्रकचा क्रमांक व पंचनाम्यातील साक्षीदार एकच आढळून आल्याने हा गैरप्रकार उघड झाला.
दहा कोटींचा साठा
या निकृष्ट सुपारीची किंमत 10 कोटी रुपये असून या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी होणार आहे. चौकशमध्ये संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास ते बडतर्फ होण्याची शक्यता आहे.
घेतली.
कोणाकोणाला केलं निलंबित?
याप्रकरणी नाशिक विभागातील सहआयुक्त अविनाश दाभाडे, अमित रासकर, गोपाळ कासार, योगेश देशमुख यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच धुळे येथील सहायक आयुक्त सुवर्णा महाजन यांच्या निलंबनाची शिफारस अतिरिक्त मुख्य सचिवांकडे पाठवली होती. गुरुवारी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या निलंबनाच्या आदेशावर सही केली.
मुंढेंचं कौतुक
मुंढेंच्या या धडक कारवाईची सध्या एफडीएबरोबरच संपूर्ण नाशिकमध्ये चर्चा असून अशाप्रकारे धडक कारवाई केल्याबद्दल कौतुक केलं जात आहे. मुंढेंनी आपल्या या भूमिकेमधून खात्यात भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही हे अधोरेखित केलं आहे.