हिवाळा येण्याआधीच महाराष्ट्रावर मोठं संकट, 5 हजारांपेक्षा जास्त गावांना धोका
5000 पेक्षा जास्त गावांना नाशिक विभागात पाणीटंचाईचा धोका निर्माण झाला असून भूजल पातळीत वेगाने घट होत आहे.
उत्तर महाराष्ट्रात तब्बल 5 हजार हून अधिक गावांना संभाव्य पाणीटंचाईचा फटका बसू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या ताज्या अहवालानुसार नाशिक विभागात नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात भूजल पातळीत लक्षणीय आणि चिंताजनक घट नोंदवण्यात आली आहे.
परतीच्या पावसाने काही भागांत हजेरी लावली असली तरी जमिनीखालील पाण्याचा साठा मात्र वेगाने आटत चालल्याचे समोर आले आहे. नाशिक जिल्ह्यात विक्रमी पावसानं नाशिक जिल्ह्यातील धरणांसोबत मराठवाड्यातील जायकवाडी हा अथांग जलाशय सुद्धा भरला मात्र तरीही भूजल पातळी वेगाने घडत असल्याने धरणांच्या या जिल्ह्यात चिंतेचा वातावरण आहे.
नाशिक विभागातील भूजल पातळीच्या जिल्हाानिहाय आकडेवारीनुसार, मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत यंदा सप्टेंबर महिन्यात नाशिक जिल्ह्यात भूजल पातळीत सरासरी 1.60 मीटरची घट झाली आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यात ही घट सर्वाधिक सरासरी 2.80 मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. धुळ्यामध्ये 1.33 नंदुरबार मध्ये 25 आणि जळगाव मध्ये 1.40 पाणी पातळीने घट झाल्याचे दिसून येत आहे.
विभागातील एकूण 772 निरीक्षण विहिरींच्या पाहणीत पाणीपातळी सरासरी 1.67 मीटरने खालावल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हिवाळा सुरू होण्याआधीच शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होण्याची चिन्हे आहेत
येवला तालुक्यात तर तब्बल 3 मीटरपेक्षा जास्त भूजल पातळी खालावली आहे. तर चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव आणि सिन्नर या तालुक्यांत 2 ते 3 मीटरने पाण्याची पातळी खाली गेली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात 1 ते 1 मीटर, तर बागलाण, इगतपुरी, कळवण, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांत 1 ते 2 मीटर घट नोंदवली गेली आहे. केवळ दिंडोरी आणि निफाड तालुक्यात किंचित वाढ पाहायला मिळाली आहे.दुसरीकडे, अहिल्यानगर जिल्ह्याची स्थिती आणखी चिंताजनक आहे. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 14 तालुक्यांमध्ये पाण्याची पातळी खालावली आहे
भूजल पातळीत झालेली ही मोठी घसरण केवळ निसर्गाचा लहरीपणा नाही, तर पाण्याचा अनिर्बंध उपसा आणि भूजल पुनर्भरण नियोजनातील त्रुटींचेही फलित आहे. ऑक्टोबर महिना संपण्याआधीच जर जमिनीतले पाणी अशा प्रकारे आटत असेल, तर ऐन एप्रिल-मेच्या उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी किती हाल सोसावे लागतील, याची कल्पनाच न केलेली बरी. आतापासूनच प्रशासनाने टंचाई निवारणासाठी ठोस कृती आराखडा राबवला नाही, तर नाशिक आणि नगर पट्ट्यात भीषण जलसंकट उभे ठाकणार हे निश्चित.