विजय खैरनारला फाशीची शिक्षा! कोर्ट म्हणालं, 'हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण'; 3 वर्षांच्या चिमुकलीवर...
या प्रकरणामध्ये आरोपीने पीडितेच्या वडिलांसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात ठेऊन चिमुकलीचं घरासमोरुन अपहरण केलं. त्यानंतर त्याने तिच्यासोबत जे काही केलं ते ऐकून आणि वाचूनच तुमच्या अंगावर काटा येईल. या प्रकरणात निकाल देताना न्यायालयाने काय म्हटलंय जाणून घ्या...
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील 3 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या केल्या प्रकरणी आरोपीला फाशीची सिक्षा सुनावण्यात आली आहे. मालेगाव सत्र न्यायालयाने हे प्रकरण दुर्मिळात दुर्मिळ प्रकरण असल्याचं नमूद करत ही शिक्षा सुनावली आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये घडलेल्या या गुन्ह्यातील आरोपी विजय संजय खैरनारवरील सर्व आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर आज या प्रकरणामध्ये अंतिम निकाल देण्यात आला.
निकाल देताना न्यायालयाने काय म्हटलं?
निर्भया प्रकरणासह इतर प्रकरणांची पडताळणी न्यायालयाने निकाल देताना केली. बालिकेचे वय लक्षात घेतलं तर ते प्रकरण आणि या प्रकरणामधील सर्व बाबी जुळतात, असं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण आहे. या महत्त्वाच्या प्रकरणामध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात येत आहे, असं न्यायालयाने निकाल देताना जाहीर केलं.
नेमकं घडलेलं काय?
16 नोव्हेंबर 2025 रोजी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेल्या घटनेमध्ये 3 वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपीने विजय खैरनारने तिची हत्या केली. प्राथमिक तपासानुसार, मुख्य आरोपी 24 वर्षांचा असून पीडित मुलीच्या वडिलांसोबत घटनेच्या सुमारे महिनाभरापूर्वी भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात ठेवून सूड उगवण्याच्या उद्देशाने आरोपी विजयने अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण केले. नराधम विजय खैरनार चिमुरडीला अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने दगडाने डोके ठेचून तिची निर्घृण हत्या केली.
गावकऱ्यांचा रास्तारोको
घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखून तीव्र निदर्शने केली आणि आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी विजय खैरनारला तात्काळ अटक केली. जनतेचा आक्रोश आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचे निर्देश दिले.
अवघ्या 23 दिवसांमध्ये तपास
पोलिसांनी अवघ्या 23 दिवसांत तपास पूर्ण करून न्यायालयात 425 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले.
आरोपी सिद्ध झाले
30 सप्टेंबर 2026 रोजी मालेगाव अप्पर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि 24 साक्षीदारांचे जबाब नोंदवल्यानंतर आरोपी विजय खैरनारला लैंगिक अत्याचार, हत्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या गुन्ह्यांत दोषी ठरवले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा सीसीटीव्ही नसतानाही वैज्ञानिक पुरावे म्हणजेच डीएनए रिपोर्ट आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयात दोष सिद्ध झाले. सरकारी पक्षाने आरोपीला कठोरात कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती.
एका वर्षाच्या आत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली
पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने प्रख्यात विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. या प्रकरणामध्ये गुन्हा घडल्यानंतर एका वर्षाच्या आत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर ॲड. उज्ज्वल निकम यांनी पत्रकार परिषद घेऊन न्यायालयातील युक्तिवादाची माहिती दिली.