पुणे जिल्ह्यातील 8 तालुक्यात दुष्काळ जाहीर; आठ दिवसात पंचनामे होणार पूर्ण, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची माहिती
पुणे जिल्ह्यात देखील ८ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलं असून पुणे जिल्ह्यातील भोर,वेल्हे,दौंड,इंदापूर, पुरंदर बारामती,शिरूर आणि खेड या तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात देखील ८ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलं असून पुणे जिल्ह्यातील भोर,वेल्हे,दौंड,इंदापूर, पुरंदर बारामती,शिरूर आणि खेड या तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या आठही तालुक्यांमध्ये प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आले असून येत्या 8 ऑक्टोबरपर्यंत पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलं असून यात भोर,वेल्हे,दौंड,इंदापूर,पुरंदर बारामती,शिरूर आणि खेड या तालुक्यांचा समावेश आहे. काल सर्व विभागांची बैठक घेण्यात आली असून सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत, की बाधित क्षेत्रातील पिकांचे पंचनामे येत्या 8 ऑक्टोबरपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करायचे आहे आणि पंचनाम्यांचा अहवाल शासनाला तातडीने सादर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत व शासकीय सवलती उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे आणि या दृष्टीने हे कामकाज सुरू देखील करण्यात आलं आहे. यात महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले असून या सर्व पथकांना तालुका स्तरावर आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले की पंचनाम्यासोबतच शेतकऱ्यांना अतिरिक्त सूट देखील देण्यात येत असून यात जमीन महसुलात सूट तसेच बाधित भागातील शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे अमली शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडित कर्जांच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी डीडीआर व जिल्हा अग्रणी बँकेमार्फत सर्व राष्ट्रीयीकृत आणि खाजगी बँकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत आणि कृषी पंपांच्या चालू वीजबिलात आवश्यक ती सवलत लागू करण्यात आली आहे आणि पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांसाठी चारा डेपो किंवा चारा छावण्यांचे नियोजन करण्यात आले आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यापासून आम्ही पाण्याचं नियोजन करत होतो. जिल्ह्यात मान्सूनमध्ये काही ठिकाणी कमी काळात जास्त पाऊस तर कधी मोठा खंड पावसाचा पडला असून पुणे जिल्ह्यात सरासरी चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये सुमारे 90 ते 95 टक्क्यांपर्यंत पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच पुढील काळात देखील अल-निनो असल्याचं अंदाज व्यक्त केल्याने पुढील वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत पुरेल अशा रीतीने जलसंपदा विभागाला पाणी वापराचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत तसेच ज्या गावांत किंवा वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवेल तेथे मागणीनुसार तात्काळ पाण्याचे टँकर सुरू केले जात आहेत असे यावेळी त्यांनी सांगितले.