'जनरल स्टोअर' 24 तास... पुणे पोलिसांनी कोर्टात असं काय सांगितलं? दुकानदाराने जिंकलेल्या केसमध्ये कोर्ट काय म्हणालं?
पुणे पोलिसांनी उच्च न्यायालयामध्ये असं नेमकं काय सांगितलं की न्यायालयाने दुकानदाराच्या बाजूने निर्णय देत पोलिसांनाच दणका दिलाय जाणून घ्या सविस्तरपणे...
किराणामालापासून अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी मिळणारं 'जनरल स्टोअर' मुंबईसारख्या घडाळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या शहरामध्येही रात्री उशीरापासून ते पहाटेपर्यंत बंद असतात. मात्र एका प्रकरणामध्ये सुनावणीदरम्यान पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनंतर आता 'जनरल स्टोअर' दिवसरात्र खुले ठेवण्याचा मार्ग मोकळा झालाय.
पोलिसांनी काय सांगितलं?
पुणे पोलिसांनी उच्च न्यायालयात या प्रकरणासंदर्भात न्यायालयासमोर बाजू मांडताना, 'जनरल स्टोअर' दिवसरात्र खुले ठेवण्यास प्रतिबंध करणारा कोणताही सरकारी जीआर अथवा आदेश नाहीत, अशी माहिती दिली. त्याची नोंद करून घेत 24 तास खुले असणाऱ्या किराणा मालाच्या दुकानावर कारवाई न करण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले.
नेमकी कोणी दाखल केली याचिका?
पुण्यातील एक दुकानदाराने ही याचिका केली होती. रात्री 10 किंवा 11 नंतर दुकान बंद ठेवण्याची सक्ती पोलीस त्याच्यावर करत होते. मात्र 'जनरल स्टोअर' आठवड्याचे सातही दिवस 24 तास सुरू ठेवता येईल, असे राज्य शासनाचे फर्मान आहे. तेव्हा पोलिसांची सक्ती अयोग्य आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.
स्थानिक नागरिकांची तक्रार नाही
न्यायमूर्ती सुमन शाम व न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. याबाबत योग्य ती माहिती सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले होते. किराणा मालाचे दुकान 24 तास खुले ठेवण्यास मनाई करणारा राज्य शासनाचा कोणताच जीआर किंवा आदेश नाहीत. दुकान 24 तास खुले असल्याने त्याची तक्रार कोणत्याच स्थानिक नागरिकाने केलेली नाही, असे पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केले.
न्यायालायने आदेशात काय म्हटलं?
स्थानिकांची दुकान 24 तास सुरु ठेवण्याला कोणताही आक्षेप नसल्याची नोंद न्यायालयाने करून घेतली. हे दुकान २४ तास सुरू ठेवण्यावर कायद्यानुसार कारवाई करता येईल. अन्यथा अन्य कोणत्याही प्रकारे पोलीस या दुकानावर कारवाई करू शकत नाहीत, असे न्यायालायने आदेशात नमूद केले.
जबरदस्ती अयोग्य
राज्य शासनाचा कोणताही जीआर अथवा निर्देश नसल्यास किराणा मालाचे दुकान रात्री 11 नंतर बंद करण्याची जबरदस्ती पोलिसांनी करणे अनधिकृत व आधारहीन आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे 24 तास जनरल स्टोअर उघडं ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाची सध्या बरीच चर्चा आहे.