पुणेकराला तब्बल ₹6.43 कोटींचा दंड... गुन्हा - न सांगता रस्ता खोदला; नेमकं प्रकरण काय समजून घ्या
अनेकदा रस्ते नेमके कोणत्या कारणासाठी कोण आणि कशासाठी खोदतो याची सर्वसमान्यांना कल्पनाच नसते. मात्र अशाप्रकारे अचानक रस्ता खोदणं एका बिल्डरला चांगलेच महागात पडलं आहे. नेमकं हे प्रकरण काय जाणून घ्या...
मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये अचानक रस्ते खोदले जातात असं पाहायला मिळतं. कधी विजेच्या तारा टाकण्यासाठी तर कधी गॅस पाईपलाइनसाठी रस्ते खोदले जातात आणि त्याचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे अशाप्रकारे खोदकाम होणार असल्याची कोणतीही पूर्व कल्पना स्थानिकांना दिली जात नाही. त्यामुळेच कोणी, कधीही, केव्हाही वाटेल तसा रस्ता खोदतं की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. मात्र अशाप्रकारे अचानक रस्ता खोदणं एकाला चांगलेच महागात पडलं असून पुणे महानगरपालिकेने या प्रकरणामध्ये तब्बल 6 कोटी 43 लाखांचा दंड ठोठावला आहे. नेमकं हे प्रकरण काय ते पाहूयात...
कोणी आणि कशासाठी खोदला रस्ता?
पुणे शहरातील सूसगाव येथील तीर्थ अविला या निवासी प्रकल्पासाठी वीज केबल टाकण्यासाठी 1760 मीटर लांबीचा रस्ता कोणतीही परवानगी न घेता परस्पर खोदण्यात आला. हे प्रकरण पुणे महानगर पालिकेच्या रस्ते विभागाला लक्षात आल्यानंतर त्यांनी कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणामध्ये रस्ता खोदणाऱ्याला तब्बल 6 कोटी 43 लाख 73 हजार 760 रुपये एवढा दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड विजय तुकाराम राऊंदळ यांच्या तीर्थ डेव्हलपर्सला ठोठावण्यात आला आहे. तीर्थ डेव्हलपर्सचा तीर्थ अविला हा प्रकल्प सुस येथील सर्व्हे क्रमांक 127/1 आणि 127/2 तसेच लगच्या जमिनीवर आहे.
एवढा दंड का आकारला?
पुणे महानगरपालिकेने एवढा दंड का आकारला यासंदर्भातील कारण एक नियम आहे. पुणे महानगरपालिकेच्या रस्ता खोदण्यासंदर्भातील धोरणानुसार अनधिकृत खोदकामा प्रकरणी प्रचलित दराच्या तिप्पट दंड आकारला आहे. या बेकायदेशीर खोदकामाप्रकरणी रयत स्वाभिमानी संघटनेने तक्रार केल्यानंतर पुणे महानगरपालिकेने संबंधित डेव्हलपर्सला स्पष्टीकरण मागणारी नोटीस बजावली. डेव्हलपरने यासंदर्भात कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही, त्यामुळे दंडाची नोटीस जारी करण्यात आली आहे. काही बातम्यांनुसार, सुमारे 95 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. रयत स्वाभिमानी संघटनेने थकबाकी वसुली, प्रकल्पांवर स्टॉप वर्क आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
कंपनीबद्दल थोडक्यात
तीर्थ डेव्हलपर्स ही कंपनी 1986 पासून कार्यरत असून तिने पायाभूत सुविधांपासून बांधकाम क्षेत्रात काम सुरु केलं. रियल इस्टेट विकास म्हणून ही कंपनी 2008 पासून काम करतेय. निवासी, व्यावसायिक, शैक्षणिक आणि औद्योगिक प्रकल्प या कंपनीच्या माध्यमातून कंपनीने उभारलेत. पुण्यातील बाणेर, सुस, कोथरूड, हिंजवडी परिसर; तसेच नवी मुंबईमध्येही या कंपनीने मागील काही वर्षांमध्ये विस्तार केला आहे. कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर पश्चिम पुण्यात 25 लाख 50 हजार चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळ विकसित केल्याचा दावा केला आहे.