पुण्यात खळबळ! भरदिवसा बड्या उद्योगपतीवर हल्ला
पुण्यात भरदिवसा बड्या उद्योगपतीवर हल्ला झाला आहे. यामुळे खळबळ माजली आहे.
Pune Crime News : बारामती मध्ये राणा शिपिंग कंपनीचे मालक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावरती हल्ला झाला आहे. बारामती विमानतळाजवळ हा हल्ला झाल्याची माहिती असून सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाल्याची माहिती आहे. यात राणा सूर्यवंशी जखमी झाले असून त्यांच्यावर बारामतीच्या खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून राणा यांना आता पुण्याला उपचारासाठी हलवण्यात आल आहे. या हल्ल्यामुळे खळबळ उडाली असून कायदा आणि सुव्यस्थेबाबात प्रश्नचिन्ङ उपस्थित झाले आहे.
राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर हल्ला कोणी केला?
राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर हा हल्ला कोणी केला याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. सुरुवातीला राणा यांना बारामती मध्ये खाजगी रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आला आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी सज्ज करण्यात आला. राणा दिलीप सूर्यवंशी हे राणा शिपिंग कार्पोरेशनचे मालक आहेत. यापूर्वी देखिल राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाला होता.
उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावर कोयत्याने हल्ला झाला आहे. सूर्यवंशी यांच्या खांद्यावर कोयत्याने वार झाला असून पाच ते सहा इंच खोल जखम झाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी ही माहिती दिली. बारामती तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपींचा शोध सुरू आहे. राणा सूर्यवंशी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. स्कुटी वरून आलेल्या दोघांनी फोटो काढायचाय म्हणत हल्ला केल्याचे प्राथमिक माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेनंतर बारामती तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून स्थानिक गुन्हे शाखेसह फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. या हल्ल्याचा सर्व बाजूने तपास केला जात आहे.
फुलांचा बुके देत असताना कोयत्याने हल्ला
स्कुटी वरून आलेल्या दोघांनी चेहऱ्याला मास्क बांधलं होतं आणि आम्ही तुमचे फॅन आहोत आम्हाला तुमच्या सोबत फोटो काढायचा आहे असं राणा सूर्यवंशी यांना सांगितलं आणि याच वेळी फुलांचा बुके देत असताना कोयत्याने राणा सूर्यवंशी यांच्या हातावर वार केल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.
सुप्रिया सुळे यांची गृहखात्यावर टीका
राणा शिपींग कंपनीचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावर बारामती एअरपोर्टच्या परिसरात गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. सुदैवाने ते यातून बचावले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
राज्यातील कायदा सुव्यवस्थेची कशी दुर्दशा झाली आहे हे दर्शविणारे हे वृत्त आहे. गुन्हेगार सहजासहजी गोळीबार करुन निघून जातात आणि गृहखात्याची यंत्रणा काहीच करु शकत नाही. लोक दहशतीखाली असून गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले आहे का अशी स्थिती आहे. गृहखात्याने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन हल्लेखोरांना अटक करावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करावी.