टायगर श्रॉफची एक्स गर्लफ्रेंड रडारवर? अभिनेत्रीच्या मुंबईसह यूपीच्या घराची सुरक्षा वाढवली, वर्षभरापूर्वी...
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात अनेक धक्कादायक अपडेट समोर येत असताना आता टायगरची मैत्रिण दिशा पाटणी हिच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक कलाकारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अभिनेता सलमान खानच्या घरीदेखील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर, अभिनेत्री दिशा पाटाणीच्या घराबाहेरही पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
टायगर श्रॉफची जवळची मैत्रणी अभिनेत्री दिशा पाटणी हिच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथील दिशाच्या मुळ निवासस्थानी तिचे कुटुंब राहते. सोमवारपासून तिथे सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या आधीही दिशा पाटणीच्या घरावर हल्ला करण्यात आला होता.
दिशा पाटणीच्या घरावर 12 सप्टेंबर 2025मध्ये गोळीबार करण्यात आला होता. बरेली येथील दिशाच्या घराबाहेर हल्ला करण्यात आला होता. बाईकवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी सुमारे 10 राउंड गोळीबार केला होता. या हल्ल्यानंतर हल्लेखोरांचा एन्काउंटर करण्यात आला होता.
या घटनेप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर 17 सप्टेंबर 2025 रोजी गाझियाबादमध्ये झालेल्या एका चकमकीत रवींद्र आणि अरुण नावाच्या दोन संशयितांचा मृत्यू झाला होता. ही कारवाई उत्तर प्रदेश पोलिसांचे विशेष कृती दल, हरियाणा टास्क फोर्स आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली होती. 2025मध्ये दिशाच्या घराबाहेर गोळीबार का करण्यात आला होता. हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आले नाहीये.
दरम्यान, टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर दिशा पाटणीने दुसऱ्याच दिवशी त्याच्या घरी जात त्याची भेट घेतली होती. टायगरवर झालेल्या हल्ल्यानंतर दिशाही अस्वस्थ असल्याचं तिच्या चेहऱ्यावरून पाहायला मिळालं. टायगर आणि दिशा हे बेस्ट फ्रेंड असल्याचं बोललं जाते. तसंच, सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांचंही ब्रेकअप झाल्याचे सांगण्यात येते. मात्र यगर आणि दिशा आता एकत्र नसले, तरी दोघांमध्ये आजही चांगली मैत्री असल्याची चर्चा आहे. दिशा ही टायगरची बहीण कृष्णा श्रॉफचीही जवळची मैत्रीण आहे. त्यामुळे टायगरच्या कठीण काळात त्याला भेटण्यासाठी दिशा पोहोचल्याने त्यांच्या नात्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
सलमान खानच्या सुरक्षेत वाढ
टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान 2024मध्ये सलमान खानच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबारानंतर त्याला मुंबई पोलिसांकडून वाय-प्लस सुरक्षा पुरवली जाते. ज्याअंतर्गंत त्याच्या घराबाहेर 24 तास पोलीस तैनात असतात. तसंच, तो जिथे जातो तिथे जीपमधून सशस्त्र पोलीस त्याच्यासोबत असतात. तसंच, सलमान जिथे भेट देणार असेल त्या ठिकाणांची स्थानिक पोलिस पथकांकडून तपासणी केली जाते. तसंच, त्याच्यासोबत असलेल्या सुरक्षा पथकांव्यतिरिक्त, तो भेट देत असलेल्या ठिकाणी अतिरिक्त कर्मचारीही तैनात केले जातात. आता त्याच्या अपार्टमेंटजवळ बॅरिकेड्स उभारून त्याची सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे.