ऐन सणासुदीच्या काळात विमान प्रवास महागला! किती रुपयाने तिकीट दर वाढले आणि काय आहे कारण?
ऐन सणासुदीच्या काळात विमान प्रवास महागला आहे. इंडिगोने आपल्या तिकीट दरात वाढ केल्यानंतर आता सर्व एअरलाइन्सने आपल्या तिकीट दर वाढवले आहेत.
दसरा - दिवाळीत त्यानंतर नाताळ आणि न्यू इयर म्हणजे सुट्टी आणि फिरायला जाण्याचा काळ असतो. ऐन सणासुदीच्या काळात विमान प्रवास महागला असून आता विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. इंडिगोपाठोपाठ एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस आणि अकासा एअरलाइन्सने त्यांच्या तिकीट दरात वाढ केली आहे. हे नवीन दर ९ ऑक्टोबर २०२६ पासून नवीन बुकिंगला लागू झाले आहेत. देशांतर्गत विमानप्रवासात प्रवाशांना आता प्रवासाच्या अंतरावर अवलंबून ४०० ते १,२०० रुपये अधिक द्यावे लागणार आहे. यामागील कारण म्हणजे एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या म्हणण्यानुसार, वाढलेल्या इंधन खर्चाचा परिणाम काही प्रमाणात कमी करण्यासाठी इंधन अधिभारात ही वाढ करण्यात आली आहे.
एअर इंडियाच्या देशांतर्गत विमान प्रवासावर किती अधिभार आहे?
एअर इंडियाने देशांतर्गत विमानसेवांवर प्रवास केलेल्या अंतरावर आधारित इंधन अधिभार निश्चित केला आहे.
अंतर: एकमार्गी इंधन अधिभार
०-५०० किमी: रु ४००
५०१-१,००० किमी: रु ६००
१,००१-१,५०० किमी: रु ८५०
१,५०१-२,००० किमी: रु १,२००
२,००० किमी पेक्षा जास्त: रु १,२००
आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचा खर्च किती वाढला आहे?
एअर इंडियाने निवडक आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी नवीन इंधन अधिभार देखील निश्चित केला आहे.
कुठे: एकमार्गी अधिभार
उत्तर अमेरिका: २१५ अमेरिकी डॉलर
ऑस्ट्रेलिया: २१० अमेरिकी डॉलर
युरोप आणि यूके: १३५ अमेरिकी डॉलर
पश्चिम आशिया/मध्य पूर्व: ५५ अमेरिकी डॉलर
अकासाच्या देशांतर्गत विमान प्रवासावर अधिभार काय आहे?
अकासा एअर देशांतर्गत विमान प्रवासावर अंतरावर अवलंबून ३७५ रुपयांपासून ते १,१५० रुपयांपर्यंत इंधन अधिभार आकारेल.
०-५०० किमी: रु ३७५
५०१-१,००० किमी: रु ६००
१,००१-१,५०० किमी: रु ९००
१,५०१ किमी किंवा अधिक: रु १,१५०
त्याच वेळी, भारतातून कुवेत, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, थायलंड आणि व्हिएतनामला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांवर २५०० रुपयांचा इंधन अधिभार आकारण्यात आला आहे.