एअर इंडियाच्या विमानाचं अपहरण झाल्याचा अलर्ट! वैमानिकाने अॅक्टिव्ह केला Squawk 7500 कोड, ATC मध्ये धावपळ, पुढच्या क्षणी...
फ्रँकफर्टहून दिल्लीला जाणारे विमान अचानक जयपूरकडे वळवण्यात आले. अहमदाबाद एटीसीला (ATC) काही सेकंदांसाठी एक आपत्कालीन अलर्ट मिळाला, जो विमान हायजॅकशी संबंधित असतो.
पायलटने अपहरणाचा संशय व्यक्त केल्यामुळे बुधवारी जर्मनीच्या फ्रँकफर्टहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान जयपूरला वळवण्यात आले. एआय-2030 हे विमान सकाळी 9.35 वाजता जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. यानंतर सुरक्षा तपासणीसाठी विमानाला आयसोलेशन बेमध्ये हलवण्यात आले. सूत्रांनुसार, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) या घटनेची चौकशी करत आहे. प्राथमिक तपासणीत विमानाचे कामकाज सामान्य असल्याचे आढळून आले.
प्राथमिक माहितीनुसार, अहमदाबाद एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास विमानातून काही सेकंदांसाठी आपत्कालीन सिग्नल मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार, पायलटने स्क्वॉक 7500 (Squawk 7500) कोड सक्रिय केला होता. हा एक आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त एव्हिएशन ट्रान्सपॉन्डर कोड आहे, जो विमानाचे अपहरण किंवा बेकायदेशीर हस्तक्षेप झाल्यास एअर ट्रॅफिक कंट्रोलला गुप्तपणे सतर्क करण्यासाठी वापरला जातो.
या सिग्नलनंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले. सकाळी 9.10 वाजण्याच्या सुमारास, दिल्ली विमानतळाच्या वॉर रूममधील अधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून विमान जयपूरला वळवण्याचा निर्णय घेतला. सकाळी 9.45 वाजता विमानाला तपासणीसाठी विलगीकरण कक्षात हलवण्यात आले.
'आयसोलेशन बे' (विलगीकरण क्षेत्र) हे विमानतळावरील असे एक निश्चित केलेले ठिकाण आहे, जिथे आणीबाणीच्या प्रसंगी सुरक्षा तपासणीसाठी विमाने उभी केली जातात. या काळात, संबंधित यंत्रणा विमानाची आणि त्या परिस्थितीशी संबंधित बाबींची तपासणी करतात.
हा अलर्ट देण्यामागील नेमकं कारण काय होतं याचा तपास आता संबंधित यंत्रणा करत आहेत. 'स्क्वॉक 7500' (Squawk 7500) हा कोड अॅक्टिव्हेट करण्यामागे नेमकी काय स्थिती उद्भवली होती याची माहिती घेतली जाईल.
एका निवेदनात अदानी एअरपोर्ट व्यवस्थापनाने सांगितले की, AI-2030 मधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत आणि त्यांना विमानातून खाली उतरवण्याची प्रक्रिया सुरू आहे; तसेच परिस्थिती सामान्य आहे. जयपूर विमानतळाचे संचालन आणि व्यवस्थापन अदानी समूहाद्वारे केले जाते.
"त्यानंतर त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानाकडे जाण्यासाठी पुन्हा विमानात बसवले जाईल. परिस्थिती सामान्य आहे आणि आम्ही प्रवासी व त्यांच्या नातेवाईकांना घाबरू नये अशी विनंती करतो. परिस्थितीनुसार आम्ही पुढील माहिती देत राहू," असे त्या निवेदनात म्हटले आहे.