SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

हिमालय पर्वताखाली अडकली 115 km लांब टेक्टॉनिक प्लेट; 8.1 तीव्रतेच्या महाप्रचंड शक्तिशाली भूकंपाचा धोका

हिमालय पर्वताखाली मोठ्या हालचाली सुरु आहेत. यामुळे 8.1 तीव्रतेच्या महाप्रचंड शक्तिशाली भूकंपाचा धोका निर्माण झाला आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 25, 2026, 10:33 PM IST | Updated: Oct 25, 2026, 10:34 PM IST
Join

हिमालय : आकाशाला गवसणी घालणारा हिमालय पर्वत पाहताना शांत दिसतो. बर्फाच्छदित हिमालय पर्वताच्या कुशीतून वाहणाऱ्या नद्या आणि स्वर्गीय निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत आहे. पण या उत्तुंग पर्वतांच्या तळाशी भयानक हालचाली सुरु आहेत. येथे भारतीय प्लेट आणि तिबेटी प्लेट एकमेकांवर आदळत आहेत. यांची टक्कर होत असली तरी दोन्ही प्लेट्स एकाच जागी अडकल्या आहेत. या घर्षणाने प्रचंड ऊर्जा निर्माण होत आहे. ही ऊर्जा आता इतकी तीव्र झाली आहे की यामुळे  8.1  तीव्रतेच्या महाप्रचंड शक्तिशाली भूकंपाचा धोका निर्माण झाला आहे. 

आयआयटी मुंबई आणि अमेरिकेतील न्यू मेक्सिको विद्यापीठाच्या संशोधकांनी, तामिळनाडूच्या केंद्रीय विद्यापीठातील शास्त्रज्ञांसोबत मिळून केलेल्या एका संशोधनात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) आणि जपानच्या ALOS-2 रडार उपग्रहाकडील डेटाच्या मदतीने हे संशोधन करण्यात आले. 

उत्तराखंडच्या खाली असलेला 'मेन हिमालयन थ्रस्ट' बनले धोकादायक क्षेत्र 

उत्तराखंडच्या खाली असलेला 'मेन हिमालयन थ्रस्ट' हा प्रचंड मोठा भूभंग सुमारे 115 किलोमीटर रुंदीमध्ये पूर्णपणे बंद झाला आहे. दोन भूपट्टिका दरवर्षी 18 मिलिमीटरच्या दराने एकमेकांवर दाब देत आहेत, परंतु त्या सरकू शकत नाहीत. यामुळे वरच्या हिमालयाची उंची दरवर्षी 4 ते 6 मिलिमीटरने वाढत आहे. अशा प्रकारे साठवलेली ऊर्जा ही दर 100 वर्षांत येणाऱ्या 8.1 तीव्रतेच्या मोठ्या भूकंपाच्या बरोबरीची असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे. 

फॉल्ट लॉकिंगचा म्हणजे काय?

पृथ्वीखाली दोन प्रचंड भूपट्ट आहेत. भारतीय भूपट्टा उत्तरेकडे सरकत असून, तिबेटी भूपट्टाच्या खाली शिरण्याचा प्रयत्न करत आहे. सामान्य परिस्थितीत, हे भूपट्ट हळूहळू सरकतात. पण जेव्हा भूभंग रेषा अडकते, तेव्हा त्यांची हालचाल थांबते. दाब वाढतच राहतो आणि ते रबरबँडप्रमाणे ताणले जातात. हा दाब तुटतो तेव्हा प्रचंड हालचाल होते. याला भूकंप म्हणतात. उत्तराखंडमधील ही भूभंग रेषा बऱ्याच काळापासून बंद आहे. शास्त्रज्ञ या भागाला 'मध्य हिमालयीन भूकंपीय दरी' असे संबोधतात. येथे अनेक शतकांपासून मोठा भूकंप झालेला नाही. त्यामुळे, ऊर्जा सतत साठत आहे. जीएनएसएस स्थानकांद्वारे मोजलेली क्षैतिज हालचाल आणि उपग्रहांद्वारे मोजलेली उभ्या दिशेतील हालचाल, या दोन्ही एकच गोष्ट दर्शवतात. मॉडेलिंगमधूनही तोच निष्कर्ष समोर आला. ही भेग घट्टपणे जोडलेली आहे. 

मोठा धोका 

इंडो-गंगेच्या मैदानी प्रदेशाला गंभीर फटका बसू शकतो. या मैदानी प्रदेशात भारताची अंदाजे 40 टक्के लोकसंख्या राहते. दिल्ली, लखनौ, कानपूर आणि पाटणा यांसारखी प्रमुख शहरेही याच प्रदेशात वसलेली आहेत. मोठ्या भूकंपाची तीव्रता शेकडो किलोमीटरपर्यंत पोहचू शकते. जुन्या इमारती, कमकुवत पूल आणि दाट लोकवस्तीच्या भागांचे सर्वाधिक नुकसान होऊ शकते असा इशारा संशोधकांनी दिला आहे.

वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजी येथील भूवैज्ञानिक डॉ. नरेश कुमार यांनी याबाबत अधिक माहिती दिली. हा भूकंप कधी येईल याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. मात्र, हिमालयात 7.5 ते 8 तीव्रतेचा भूकंप येण्याचा धोका निश्चित आहे. मात्र, हा भूकंप कधी येईल याबाबत निश्चित तारीख समोर आलेली नाही. 

ऊर्जेचा वैज्ञानिकदृष्ट्या अंदाज कसा लावला 

संशोधकांनी दोन प्रकारच्या डेटाचा वापर केला. GNSS (उपग्रह-आधारित स्थिती निर्धारण प्रणाली), ज्याने जमिनीच्या आडव्या हालचालीचे मोजमाप केले, आणि जपानच्या ALOS-2 उपग्रहाचे InSAR तंत्रज्ञान, ज्याने जमिनीच्या वर उचलल्या जाण्याच्या आणि खाली जाण्याच्या दराची गणना केली.  या माहितीचे एकत्रीकरण करून, त्यांनी 'इलास्टिक सबडक्टिंग प्लेट मॉडेल' नावाचे एक प्रारूप तयार केले. या प्रारूपाने दोन्ही प्रकारच्या हालचालींचे अचूक स्पष्टीकरण दिले. या विश्लेषमातून असे दिसून आले की, ही भ्रंशरेषा 115 किलोमीटर रुंदीपर्यंत स्थिर झाली आहे. 

हिमालयीन प्रदेशात यापूर्वीही आलेत मोठे भूकंप 

हिमालयीन प्रदेशात यापूर्वीही मोठे भूकंपाचे धक्के बसले आहेत. 1905 चा कांग्रा भूकंप, 1934 चा बिहार-नेपाळ भूकंप आणि 2015 चा नेपाळ भूकंप हे सर्वात शक्तिशाली मानले जातात. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES