'आधी कौतुक मग फोटो हटवण्याची कारवाई...', प्रदर्शनातून फोटो हटवल्याबद्दल प्रियांका गांधींचा मुलगा रेहान नाराज; प्रियांका यांची पोस्ट चर्चेत
प्रियंका गांधी वाड्रा आणि रॉबर्ट वाड्रा यांच्या मुलगा रेहान सध्या चर्चेत आहे. 'नो आयडिया इज फायनल' नावाच्या एकल प्रदर्शनातून त्याने काढलेला फोटो हटवण्यात आला आहे.
काँग्रेस नेत्या आणि लोकसभा खासदार प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान एका प्रदर्शनातील फोटोमुळे चर्चेत आला आहे. दिल्लीतील बिकारनेर हाऊसमधील रेहानने काढलेले 70 फोटो प्रदर्शनातून हटवण्यात आले आहेत. याबद्दल खुद्द रेहानने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. नो आयडिया इज फायनल या एकल प्रदर्शनातून 100 हून अधिक छायाचित्र होती. यातून रेहानची 70 फोटो प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या काही तासापूर्वी हटवण्यात आली. रेहानने दिल्लीतील आंदोलनावचे फोटो या प्रदर्शनात लावली होती. या घटनेमुळे एका वादाला तोंड फुटलंय.
'आधी फोटोचं कौतुक मग हटवण्याची कारवाई...'
दरम्यान या कारवाईबद्दल रेहानने नाराजी व्यक्त केली आहे. तो म्हणाला की, काल संध्याकाळी 6 वाजता, बिकानेर हाऊस व्यवस्थापनाने मला फोन करून सांगितले की, मी जे काही फोटो प्रदर्शित करणार होतो ते आक्षेपार्ह असून त्यांच्या धोरणाविरुद्ध आहेत. मी म्हणालो, ठीक आहे, ते फोटो कोणते आहेत ते मला सांगा, त्याचे कारण द्या, ते मला लेखी स्वरूपात द्या, कारण जोपर्यंत तुम्ही मला संपूर्ण स्पष्टीकरण देत नाही तोपर्यंत मी ते फोटो लगेच काढणार नाही. काल दुपारपर्यंत त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही. काल दुपारी, त्यांनी मला आधी सांगितले की त्यांची टीम प्रदर्शन पाहण्यासाठी आली होती आणि त्यांनी माझ्या फोटोंचे कौतुक केले. त्यानंतर दुपारी, मला उपनिवासी आयुक्तांचा फोन आला, ते म्हणाले की आम्हाला ते सर्व फोटो काढावे लागतील. मी म्हणालो, कृपया ते मला लेखी स्वरूपात द्या. ते आम्हाला ते लेखी स्वरूपात देण्यास नकार देत होते. मग प्रधान निवासी आयुक्त आले. त्यांनी माझ्यासोबत प्रदर्शनाची पाहणी केली आणि मुळात सांगितले की ही चित्रे प्रदर्शित करण्याचा संदर्भ आणि वेळ चुकीचा होता आणि मी ही चित्रे त्यांना आधी दिली नव्हती.
'जे सत्य आहे त्याच्यासाठी...!'
दरम्यान प्रियांका गांधी यांनीही आपल्या मुलाचे फोटो काढून टाकल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिलंय की, जे सत्य आहे त्याच्यासाठी उभे राहा, आणि प्रत्येक सुंदर गोष्ट आपोआप तुमच्यापर्यंत पोहोचेल. मला तुझा अभिमान आहे आणि नेहमीच राहील.
'पण, शेवटच्या 24 तासांत'
रेहानचे वडील रॉबर्ट वाड्रा यांनी मुलाचे प्रदर्शनातील फोटो काढून टाकल्या प्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, सुमारे एक आठवडा आधी, त्याने बिकानेर हाऊसच्या अधिकाऱ्यांकडे एक पीडीएफ फाईल सादर केली होती. तेव्हा त्यांनी कोणतीही चिंता किंवा त्यातील मजकूर वादग्रस्त असल्याचे सुचवणारी कोणताही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण, शेवटच्या 24 तासांत, त्याने आणि त्याच्या टीमने प्रदर्शन उभारण्यासाठी आणि मांडणी करण्यासाठी खूप मेहनत घेतल्यानंतर, काही अधिकारी ऐनवेळी आले आणि त्यांनी मांडलेल्या प्रत्येक गोष्टीची पुन्हा तपासणी करुन फोटो हटवण्यात आले.
तिरंग्याचे चित्र काढण्यास नकार...
दरम्यान इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका निवेदनात रेहानने स्पष्ट केलं की, आयोजकांनी त्याला भारतीय ध्वजाची दोन फोटो काढण्याचे निर्देशही दिले होते. पण त्याने ते फोटो काढण्यास नकार दिला. तर आता रेहान या सर्व फोटोचे प्रदर्शित करण्यासाठी तो लवकरच दुसरी जागा शोधणार आहे.