"जनतेला मोदी-शहांचे भ्रष्ट आणि बेमुर्वतखोर सरकार नको आहे व तरुण मुलांनी त्याविरोधात संघर्ष सुरू केला आहे. भारताची निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सडली आहे व राजीव कुमार, ज्ञानेश कुमार यांच्यासारख्या निवडणूक आयुक्तांनी मोदी-शहांच्या पापकर्मांचे ‘वाहक’ म्हणून काम केले. त्यामुळे सगळ्यात आधी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना जावे लागेल. ज्ञानेश कुमार यांनी शहाणपणाने राजीनामा दिला नाही तर देशात गोंधळाची स्थिती निर्माण होईल," असा इशारा राज्यसभा खासदार तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिला आहे. तसेच देशामध्ये अराजक माजवण्याचा हेतू असल्याच्या टीकेचाही राऊत यांनी 'सामना'मधील 'रोखठोक' सदरामधून समाचार घेतलाय.
त्या सगळ्यांनी डोळ्यांची झापडे बंद केली
"महागाई, राज्यकर्त्यांची मनमानी, निवडणूक घोटाळे याविरोधात ‘युरोप’मधील अनेक राष्ट्रांत जनता रस्त्यावर उतरली आहे. फ्रान्स पेटले आहे. इटलीत जनता श्रीमती मेलोनी यांच्या सरकारला हादरे देत आहे. इटलीतील अनेक प्रमुख शहरांत जाळपोळ सुरू आहे. अल्बेनिया हा एक लहान देश आहे. तेथे जनतेच्या असंतोषाचा उद्रेक झाला आहे. भ्रष्ट राज्यव्यवस्थेस पाठबळ देणाऱ्या तेथील सुप्रीम कोर्टाच्या इमारतीला आग लावली गेली. लोकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडाला की, अशी ‘आगबाजी’ सुरू होते. हे अराजक आहे व भारतात असे अराजक निर्माण करण्याच्या हालचाली सुरू आहेत असे ‘भाजप’चे लोक बोलतात. त्या सगळ्यांनी डोळ्यांची झापडे बंद केली आहेत," असा टोला राऊतांनी लगावला आहे.
मोदींच्या अंधभक्तांना...
"देश मोठा असो की छोटा, जनतेच्या मनात हुकूमशाहीविरुद्ध लढण्याची प्रेरणा निर्माण होणे महत्त्वाचे. बाजूच्या श्रीलंका, नेपाळ, बांगलादेशात ही प्रेरणा निर्माण झाली. बांगलादेशच्या निवडणूक आयुक्ताला संतप्त जनतेने फरफटत घराबाहेर काढले. गळ्यात चपलांची माळ घालून त्याची सार्वजनिकरीत्या धिंड काढली व आज हे महाशय ढाक्क्याच्या तुरंगात आहेत. बांगलादेशच्या निवडणूक आयुक्ताने भारतातील ज्ञानेश कुमार, राजीव कुमारप्रमाणे अनेक ‘पापकर्मे’ केली व तेथील भ्रष्ट राज्यकर्त्यांच्या विजयात हातभार लावला. भारतातील जनता आंधळी नाही. युरोपियन राष्ट्रांपासून आशिया खंडातील राष्ट्रांपर्यंत जनता लोकशाही रक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याचे ती पाहत आहे. हे अराजक आहे असे मोदींच्या अंधभक्तांना वाटत असेल तर तो त्यांचा बुद्धिदोष आहे," असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
चिंतन मोदी-शहांच्या अंधभक्तांनी करावे
"अल्बेनिया हा युरोपातील एक छोटा देश. तेथे आंदोलकांनी संसद, मंत्रालये व सुप्रीम कोर्टाला आगी लावल्या. त्याबाबतचे ‘व्हिडीओ’ मी समाज माध्यमांवर टाकले. जगात काय सुरू आहे व जनता हुकूमशाहीविरुद्ध रस्त्यावर उतरत असल्याचे मी म्हटले. भारताने सावधानता बाळगायला हवी असे मी व्यक्त झालो. यावर संजय राऊत हे अराजकाचे समर्थन करीत आहेत व सुप्रीम कोर्टाला धमकावत असल्याची बोंब भाजपच्या अंधभक्तांनी मारली. अंधभक्तांनी त्यांचे कर्तव्य बजावले, पण अल्बेनियातील पेटवापेटवीचे मूळ काय? अल्बेनियाची संसद आणि सुप्रीम कोर्ट लोकांनी नष्ट केले. शिक्षण खात्यावर ताबा मिळवला. हे का घडले याचे चिंतन मोदी-शहांच्या अंधभक्तांनी केले पाहिजे," असा सल्ला राऊत यांनी दिला आहे.
अल्बेनियात काय झालं?
"अल्बेनियातील सध्याची राजवट ही अनियमित आणि भ्रष्ट आहे. देशातील मोक्याच्या जमिनी जारेड कुशनरला (प्रेसिडंट ट्रम्प यांचा जावई) विकल्या जात आहेत. यात अनेक शेतकरी, स्थानिक रहिवासी भरडले गेले आहेत. लोक सुप्रीम कोर्टात गेले तर तेथेही सरकारी दबाव आणि भ्रष्टाचार. त्यातून शेतकऱ्यांवर अन्याय झाला. परकीय शक्तीला देशाची सार्वजनिक संपत्ती विकण्याच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली व त्या उद्रेकातून संसद, सुप्रीम कोर्टाला आगी लावण्यात आल्या. भारतात अशा प्रकारचे अराजक निर्माण व्हावे असे कुणालाच वाटणार नाही, पण जागतिक घडामोडींचा संदर्भ देणे हेसुद्धा भाजपला मान्य नाही व ते आता अकांडतांडव करत आहेत," असं राऊत आपली बाजू मांडताना म्हणालेत.
शरीर वाघाचे आणि काळीज उंदराचे
"मोदी-शहा व त्यांचे सरकार आता दुबळे झाले आहे. भीतीचा ब्रह्मराक्षस त्यांच्या मानेवर बसला आहे. लोक मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर येऊन आपली कोंडी करतील व त्यामुळे राजीनामा द्यावा लागेल अशी भीती मोदी-शहांना वाटत आहे. त्यामुळे मच्छर, झुरळे, उंदीर वगैरेंना ते घाबरत आहेत. मोदी व शहा 12 वर्षे शौर्य आणि मर्दानगीच्या गर्जना करत होते. प्रत्यक्षात शरीर वाघाचे आणि काळीज उंदराचे अशी त्यांची गत झाली आहे," असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा घाबरून बसले
"देशात सध्या जी स्थिती निर्माण झाली आणि ज्यामुळे पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा घाबरून बसले आहेत, ती त्यांनी स्वतःच निर्माण केली आहे. त्यास पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार नाहीत इतकेच यानिमित्ताने सांगायचे आहे!" असा टोमणा राऊत यांनी लेखाच्या शेवटी मारला आहे.