2 प्रसिद्ध बँकांचे होणार मर्जर, RBI ने दिली मंजुरी;ग्राहकांवर काय परिणाम होणार?
एमिरेट्स एनबीडीची आरबीएल बँकेतील गुंतवणूक ही भारतीय बँकिंग क्षेत्रातील मोठ्या परदेशी गुंतवणुकींपैकी एक आहे.
बँकिंग क्षेत्रातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने दुबईस्थित एमिरेट्स एनबीडी बँकेच्या भारतातील शाखांचे RBL बँकेत विलीनीकरण करण्यास मंजुरी दिली आहे. हा बदल 1 डिसेंबर 2026 पासून लागू होणार आहे. या तारखेपासून एमिरेट्स एनबीडीच्या भारतातील सर्व शाखा आरबीएल बँकेच्या शाखा म्हणून कार्यरत होतील. भारतीय बँकिंग क्षेत्रातील परदेशी गुंतवणुकीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
1 डिसेंबरपासून विलीनीकरण
एमिरेट्स एनबीडी बॅंक पी.जे.एस.सीच्या भारतातील शाखांचे आरबीएल बँक लिमिटेडमध्ये विलीनीकरण करण्याच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 मधील कलम 44ए(4) अंतर्गत ही मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेची प्रभावी तारीख 1 डिसेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर एमिरेट्स एनबीडीच्या भारतातील शाखा RBL बँकेच्या शाखा म्हणून काम करतील. हा बदल भारतातील या दोन बँकांच्या कामकाजाच्या रचनेशी संबंधित आहे.
एमिरेट्स एनबीडीने आरबीएल बँकेत घेतला 60 टक्के हिस्सा
या विलीनीकरणाची पार्श्वभूमी एमिरेट्स एनबीडीने आरबीएल बँकेत केलेल्या मोठ्या गुंतवणुकीशी संबंधित आहे. जून 2026 मध्ये एमिरेट्स एनबीडीने सुमारे 2.75 अब्ज डॉलर म्हणजेच अंदाजे 26 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक पूर्ण केली. या व्यवहारातून आरबीएल बँकेतील सुमारे 60 टक्के हिस्सा एमिरेट्स एनबीडीकडे आला.हा व्यवहार ऑक्टोबर 2025 मध्ये जाहीर करण्यात आला होता. आवश्यक नियामक आणि सरकारी मंजुरी मिळाल्यानंतर जून 2026 मध्ये गुंतवणूक पूर्ण झाली.
भारतातील तीन शाखांचा आरबीएल बँकेत समावेश
एमिरेट्स एनबीडीची भारतातील शाखा मुंबई, गुरुग्राम आणि चेन्नई येथे आहे. या शाखांचे कामकाज विलीनीकरणानंतर आरबीएल बँकेच्या व्यवस्थेखाली येणार आहे. त्यामुळे परदेशी बँकेच्या भारतातील शाखांचे स्वतंत्र कामकाज आणि आरबीएल बँकेचे देशांतर्गत बँकिंग नेटवर्क यांची सांगड घातली जाणार आहे.आरबीएल बँकेचे भारतातील ग्राहक आणि शाखांचे जाळे, तसेच एमिरेट्स एनबीडीचे आंतरराष्ट्रीय बँकिंगमधील अनुभव यांचा एकत्रित वापर करण्याची संधी या व्यवहारातून निर्माण होऊ शकते.
ग्राहकांच्या खात्यांवर काय परिणाम होणार?
विलीनीकरणाची घोषणा झाल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या खात्यांचे काय होणार, इंटरनेट बँकिंग बदलणार का किंवा शाखेत जाण्याच्या प्रक्रियेत बदल होईल का, असे प्रश्न पडू शकतात. आरबीएलच्या प्रसिद्धिपत्रकात मुख्यतः शाखांच्या विलीनीकरणाची प्रभावी तारीख आणि त्यानंतरचे कामकाज स्पष्ट केले आहे.ग्राहकांनी आपल्या खात्यांशी संबंधित बदल, सेवा अटी, संपर्क क्रमांक, डिजिटल बँकिंग आणि आवश्यक कागदपत्रांबाबत आरबीएल बँक किंवा एमिरेट्स एनबीडीकडून येणाऱ्या अधिकृत सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आलंय.
भारतीय बँकिंग क्षेत्रासाठी महत्त्वाचा व्यवहार
एमिरेट्स एनबीडीची आरबीएल बँकेतील गुंतवणूक ही भारतीय बँकिंग क्षेत्रातील मोठ्या परदेशी गुंतवणुकींपैकी एक आहे. या व्यवहारामुळे आरबीएल बँकेला भांडवलाची ताकद मिळाली असून, आंतरराष्ट्रीय बँकिंग क्षेत्रातील अनुभवाचा फायदा घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मात्र, विलीनीकरणामुळे ग्राहकांना तात्काळ अधिक चांगल्या सेवा मिळतील किंवा कर्जदर कमी होतील, असा निष्कर्ष सध्या काढता येत नाही. त्यासाठी बँकेचे पुढील निर्णय, सेवा धोरण आणि अधिकृत घोषणा महत्त्वाच्या ठरतील. 1 डिसेंबरपासून शाखांच्या कामकाजात होणारा बदल हा या प्रक्रियेतील निश्चित टप्पा आहे.