W, W, W, W, W...; गोलंदाजाचा डबल हॅट्ट्रीकसह जबरदस्त वर्ल्ड रेकॉर्ड! एकाच ओव्हरमध्ये घेतले 5 विकेट्स
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाने एकाच ओव्हरमध्ये पाच विकेट घेतले, ज्यामध्ये 'डबल हॅट्ट्रिक'चाही समावेश होता.
कोणत्याही गोलंदाजासाठी एका ओव्हरमध्ये तीन विकेट घेत हॅट्ट्रिक करणं हे खूप मोठे यश आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज चॅड लेकॉक याने एकाच ओव्हरमध्ये 5 विकेट्स घेत इतिहास रचला आहे. लेकॉकने ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर एक विकेट घेतली. दुसऱ्या चेंडूवर मात्र तो विकेट घेऊ शकला नाही. मात्र यानंतरच्या चारही चेंडूत त्याने चार विकेट्स घेत डबल हॅट्ट्रीक पूर्ण केली. ज्याप्रमाणे तीन विकेट घेतल्यानंतर हॅटट्ट्रीक म्हणतात त्याप्रमाणे 4 विकेट घेतल्यास डबल हॅट्ट्रीक होते.
दक्षिण आफ्रिकेतील 2026 च्या 'टी-20 चॅलेंज लीग'मध्ये चॅड लेकॉकने एकाच ओव्हरमध्ये पाच विकेट्स घेण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 क्रिकेटमध्ये एका षटकात पाच बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. या स्पर्धेत लेकॉक 'क्वाझुलु-नताल इनलँड टस्कर्स' संघाकडून खेळत आहे. मंगळवारी (13 ऑक्टोबर) 'क्वाझुलु-नताल इनलँड टस्कर्स' आणि 'टायटन्स' यांच्यात 'पूल बी'मधील सामना झाला.
पहिल्या डावातील चमकदार कामगिरी
'क्वाझुलु-नताल इनलँड टस्कर्स'ने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या 'टायटन्स' संघाने 18 व्या षटकाच्या अखेरीस आपली धावसंख्या 190 धावांच्या जवळ पोहोचवली होती. 19 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या चॅड लेकॉकने सामन्याचे संपूर्ण चित्रच बदलून टाकले. धावसंख्या 230 किंवा 240 पर्यंत जाईल असे वाटत असताना, संघाची एकूण धावसंख्या केवळ 204 पर्यंतच मजल मारू शकली. लेकॉकने 19 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ल्युस डू प्लॉयचा बळी घेतला.
दुसऱ्या चेंडूवर दोन धावा आल्या. त्यानंतर ओव्हरचे चार चेंडू शिल्लक होते. या चार चेंडूंमध्ये लेकॉकने कर्णधार दयायन गालिम, अफिवे म्न्यंदा, जँको स्मिट आणि एसोसा आयहेव्बा यांच्या विकेट्स घेतल्या. परिणामी, संघाची धावसंख्या 185/4 वरून 195/9 अशी झाली. चॅड लेकॉकने आपल्या 4 षटकांत 26 धावा देत एकूण 6 बळी घेतले.
टायटन्सने 21 धावांनी जिंकला सामना
प्रथम फलंदाजी करताना, टायटन्सचा संघ 19.5 षटकांत 204 धावांत सर्वबाद झाला. सलामीवीर लुआन-द्रे प्रिटोरियसने 36 चेंडूंत 81 धावांची सर्वाधिक धावसंख्या असलेली खेळी केली; यात 11 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता आणि त्याचा स्ट्राईक रेट 225 होता. मात्र इनलँड टस्कर्सचा संघ 20 षटकांत 6 बाद 183 धावांपर्यंतच मजल मारू शकला. चॅड लेकॉकच्या वर्ल्ड रेकॉर्ड गोलंदाजीनंतरही संघाला पराभवाचा सामना करावा लागला.