'माझ्या जीवाला धोका...'; मराठी अभिनेत्याची खळबळजनक पोस्ट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत, म्हणाला, 'आई- वडिलांनी रक्ताचं पाणी करून...'
मराठी अभिनेता अभिजीत केळकर यांने एक फेसबुक पोस्ट केली असून त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही विनंती केली आहे.
मराठी मालिका आणि सिनेमांमधून घराघरांत पोहोचलेला कलाकार अभिजित केळकर सध्या चर्चेत आला आहे. ते म्हणते अभिजीतने केलेल्या एका फेसबुक पोस्टमुळं. या पोस्टमध्ये त्याने माझ्या जीवाला धोका असल्याचं नमूद केलं आहे. तसंच, त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टॅग करत मदतीची विनंती आहे. मालाड इथल्या चाळीवर काही बिल्डर आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून लोकांची घरं जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अभिजीत केळकरची पोस्ट काय?
अभिजीत केळकरनं फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की, "माझ्या मनात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल प्रेम, आदर आहे. पण, दिव्याखाली अंधार आहे. कारण आमच्या मालाड पूर्व, पुष्पापार्क, बाणडोंगरी या भागात असलेली आमची घरं वडिलोपार्जित आहे. आमच्या आई-वडिलांनी इथं रक्ताचं पाणी केलं. आम्हाला वाढवलं. काडी-काडी जमवून संसार केला. तुम्ही हवं तर याला झोपडपट्टी म्हणा. पण गरिबांचं छप्पर हिरावून त्यांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधींकडून सुरु आहे..."
बिल्डरच्या पैशावरून हे लोकप्रतिनिधी सगळं हातळत आहेत. यांच्या पैशाच्या जोरावर सिस्टिमला हातावर खेळवलं जातय. गुंड पाठवून लोकांना धमक्या दिल्या जाताय. तसंच, कोणतही अॅग्रीमेंट न करता, कागदपत्र न दाखवता लोकांची घर जमीन दोस्त केली जात आहे. मी हे सहा महिन्यांपासून बघतोय. मी कोणाचं नाव घेणार नाही. मला कोणाला बदनाम करायचं नाही. पण पुढे जाऊन नावं घ्यावी लागतीय. कारण मी कोणाला घाबरत नाही. माझ्या जीवाला धोका आहे. घरी आई, बायको, मुलांना सांगून निघालोय. आम्हाला न्याय हवा आहे. आम्हाला हक्काची घरं हवी आहे. त्यासाठी तुमची मदत हवी आहे, अशी विनंती अभिजीत केळकरने केली आहे.
आम्ही रिडेव्हलपमेंटच्या विरोधात नक्कीच नाही पण ज्या डेव्हलपमेंटचा पायाच फ्रॉड डॉक्युमेंटवर उभारला जातोय ती डेव्हलपमेंट पोकळ आहे. आम्हाला न्याय हवाय, तो आपल्याकडून मिळेल ह्याबद्दल मला खात्री आहे. बाकी देवाक काळजी, असंही त्याने पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
अभिजीत केळकरची आणखी एक पोस्ट!
दरम्यान, अभिजीतने आणखी एक पोस्ट केली आहे. त्यात त्याने म्हटलंय की, माझ्या कालच्या पोस्टवर, आमच्याच एरियातल्या , बाधित लोकांच्या, ज्यांना नोटिसा आलेल्या आहेत, ज्यांना बिल्डर त्याच्या गुंडांकरवी धमकावतो आहे, जे बिल्डरच्या मनमानी कारभाराच्या, त्याच्या गुंडांच्या विरोधात आहेत... ज्यांच्यासाठी मी लढतोय, त्यातल्या काही लोकांच्या ह्या बोलक्या प्रतिक्रिया, असं म्हणत अभिजीतने काही नागरिकांच्या प्रतिक्रियांचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.