अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर बॉलिवूड धास्तावले आहेत. हल्लेखोरांनी अनेक कलाकारांच्या घराबाहेर रेकी केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता पोलिसही अलर्ट झाले आहेत. मुंबई पोलिसांनी बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेसाठी सल्ला दिला आहे. यात त्यांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा असं सांगण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांनी बॉलिवूड कलाकारांसाठी एक इशारा दिला आहे. एलीकडेच अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार करण्यात आला होता. यात अभिनेत्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसली तरी या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. इतकंच नव्हेतर, अभिनेता रणबीर कपूर, आमिर खान, अमिताभ बच्चन यांच्या घराचीही रेकी करण्यात आली होती. म्हणूनच मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून हा सल्ला दिला आहे.
सूत्रांनुसार, पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत परिस्थिती सामान्य होत नाही. तो पर्यंत कलाकारांनी सावध राहण्याची गरज आहे. या सूचनेनुसार कलाकारांनी गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. चाहत्यांशी थेट संवाद आणि सार्वजनिक ठिकाणी वावरणे देखील सध्या स्थगित करण्यात आले आहे किंवा ते टाळण्याचा इशारा देण्यात आला आहे.
काही प्रमुख कलाकारांच्या घराबाहेर पाळत किंवा टेहळणी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यामुळे सुरक्षा यंत्रणांना धोक्याची सूचना मिळाली. ही बाब लक्षात घेऊन, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हा खबरदारीचा उपाय योजला आहे. चित्रपटांच्या प्रमोशन इव्हेंटमध्य आणि कार्यक्रमांदरम्यान बॉलिवूडमध्ये अनेकदा प्रचंड गर्दी जमते, जिथे चाहते आपल्या आवडत्या कलाकारांना पाहण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी उत्सुक असतात व मोठी गर्दी करतात.
अभिनेते आयुष्मान खुराना आणि तुषार कपूर यांनाही लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचे मेसेज आल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी बंगळूरू येथील वैभव मिश्रा या तरुणाला अटक केली आहे. तपासात असे आढळून आले आहे की, तो एका गँगचा सदस्य असल्याचे भासवून कलाकारांना धमक्या देत होता. यापूर्वी, चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. टायगर श्रॉफ प्रकरणानंतर, अमिताभ बच्चन यांनीही आपल्या घराबाहेरील बुलेटप्रुफ काच बसवण्यात आली होती.