पुण्यात प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान हत्येच्या रात्री नेमकं काय झालं होतं हे आता समोर आलं आहे. काही वर्षापूर्वी नोकरीच्या निमित्ताने एका ॲपवरून दोघांची ओळख झाली होती. साडे तीन वर्षांपूर्वी दोघात प्रेम फुलले होते. पण प्रेमाचं लग्नात रूपांतर होण्यापूर्वीच तिची हत्या झाली. हिंजवडी मधल्या सॉफ्टवेअर जोडप्याची प्रेम कहाणी आणि तीच्या दुर्दैवी अंताची कहाणीने सगळेच हादरले आहेत.
आयटी नगरी हिंजवडी एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीच्या हत्येने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नामवंत कंपनीत काम करणाऱ्या कोमल डहाके हिची तिचाच प्रियकर आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर शुभम काळबांडे याने हत्या केली आहे. शुभम आणि कोमलची साडे तीन वर्षांपूर्वी नोकरीच्या निमित्ताने एका ॲप वरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी आयुष्य एकत्र जगण्याच्या आणा भाका घेतल्या. पण या प्रेम कहाणीचा अंत मात्र कोमलच्या हत्येने झाला.
कोमल आणि शुभम प्रेमात असले तरी कोमल शुभमसाठी खूपच संवेदनशील होती. शुभमचे इतर मुलींशी प्रेमसंबंध असल्याचा संशय ती शुभमवर घेत होती. त्याचमुळे सातत्याने शुभम आणि कोमल हिचे वाद होत होते. हत्येच्या दिवशी ही दोघांमध्ये याच कारणावरून वाद झाला होता, आणि त्याच वादातून शुभमने कोमलची हत्या केली. हत्येच्या उद्देशानेच शुभमने कोमलला मारहाण केल्याची माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) सिद्धराम म्हेत्रे यांनी दिली आहे.
शुभम 22 तारखेला नेहमी प्रेमाने कोमलला भेटण्यासाठी हिंजवडीमधल्या साखरे वस्ती इथल्या प्रिस्टिन पीजी हॉस्टेलवर गेला. दोघे जेवणासाठी गेले होते. पण परत आल्यानंतर कोमलने पुन्हा एकदा शुभमवर संशय घेतला आणि लिफ्टमध्येच दोघांचा वाद सुरू झाला. दोघांचा वाद अगदी विकोपाला गेला आणि शुभमने कोमलला प्रचंड मारहाण करत तfला भिंतीवर आदळलं. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे शुभम रात्रभर तिच्या मृतदेहाजवळ बसून होता. सकाळी त्याने 112 नंबरवर ॲम्ब्युलन्स साठी फोन केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर हत्येचा प्रकार समोर आला.
पोलिसांनी हत्येचं कारण कोमल हिचा संशयी स्वभाव सांगितले असले तरी कोमलच्या कुटुंबियांनी मात्र आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. एवढंच नाही तर शुभमबद्दल काहीच माहिती नसल्याचा दावा कोमलच्या कुटुंबियांनी केला आहे. पीजी मुलींचे असताना तिथ मुलगा गेलाच कसा असा सवाल करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ही त्यांनी केली आहे.
हत्येनंतर पोलिसांनी आरोपी शुभम याला अटक केली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. तपासानंतर या हत्येसंदर्भात इतरही अनेक उलगडे होण्याची शक्यता आहे.