गोरं होणं जीव घेणं! मित्राच्या सल्ल्याने फेअरनेस क्रीम वापरली अन् पायावर सूज..., किडनीवरही गंभीर परिणाम, प्रसिद्ध गायकाच्या दावा
एका प्रसिद्ध गायकाने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत गंभीर दावा केला आहे. फेअरनेस क्रीममुळे त्याच्या किडनीवर गंभीर परिणाम झाला आहे.
सोशल मीडिया असो किंवा टीव्ही असो यावरून मोठ्या प्रमाणात असंख्य फेअरनेस क्रीमचे जाहिरात आपण पाहत असतो. या जाहिराती इतक्या आकर्षक असतात की गोरं दिसण्याच्या इच्छेसाठी लोक भरमसाठ पैसे खर्च करतात. याच मोहात एक प्रसिद्ध गायक सापडला आणि त्याला फेअरनेस क्रीममुळे गंभीर आजाराचा सामना करावा लागतोय, असा दावा त्याने खुद्द केला आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाऊंटवर रविवारी एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात त्याने वापरलेल्या फेअरनेस क्रीमबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.
हा गायक आणि संगीतकार आहे, सलीम कोड़ाथूर. त्याने सांगितलं की, 10 वर्षांपूर्वी मित्राच्या सल्ल्यानुसार, फेअरनेस वाढवणारी क्रिम वापरली. आता त्याला गंभीर आजाराचा सामना करावा लागतोय. काही महिन्यांतच त्याच्या पापण्या आणि पाय सुज आली. त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली. गायकाने सांगितलं की, त्याला डॉक्टराने सांगितलं की, एल्ब्यूमिनची पातळी कमी असल्यामुळे आता ही समस्या झाली आहे. डॉक्टरांनी इशारा दिलाय की, प्रोटीनची पातळी कमीच राहिली तर किडनी निकामी होण्याची भीती आहे.
सलीम यांनी सांगितलं की, किडनी बायोप्सीनंतर त्याला 'मेम्ब्रेनस नेफ्रोपैथी' चे निदान झालं आहे. त्यांनी ही क्रीम 500 रुपयांना विकत घेतली होती आणि एका वर्षापेक्षा जास्त काळ तिचा वापर केला. मात्र आरोग्याच्या समस्या अजूनही त्यांना त्रास देत आहेत, विशेषतः झोपेच्या तक्रारी. "मी दिवसातून फक्त दोन-तीन तासच झोपू शकतो. काही वेळा तर मला झोप येण्यासाठी औषध घ्यावं लागतं" असं म्हटलं आहे.