Explained: आई, बाप, भाऊ, बहीण, बायको... सगळे भाड्याने मिळतील! रेंटवर नातेवाईक मिळणाऱ्या देशाची गोष्ट; पण याची गरज काय?
तुम्हाला पैसे कमवण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडे त्याचा नातेवाईक म्हणून जाण्यास सांगितलं तर तुम्ही जाल का? खरं तर भारतातल्या लोकांना हा प्रश्न विचारल्यावर आणि नातेवाईक हे ऐकल्यानंतरच अनेकजण 'आम्ही आमच्या नातेवाईकांकडे जात नाही इथं काय जाणार?' म्हणून ही ऑफर फेटाळून देऊ शकतात. पण एका देशात खरोखरच अशापद्धतीने भाड्याने नातेवाईक मिळतात. याच अनोख्या सेवेबद्दल जाणून घेऊयात...
खरं तर नातेवाईक म्हटल्यावर अनेक भारतीय नाक मुरडतात! भारतीय कुटुंब पद्धतीमध्ये नातेवाईकांना अनन्य साधारण महत्त्व आहे. भारतात लहानाचं मोठं झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या अगदी लहानपणापासूनच्या आठवणींमध्ये जवळचे नातेवाईक असतात. त्यातही नातेवाईक प्रसिद्ध व्यक्ती असेल तर तिच्यासोबत मिरवण्याची आणि तिच्या ओळखीतून काम करुन घेणाऱ्यांची संख्याही भारतात कमी नाही. पण जगात सगळीचे अशी स्थिती नाही. असे अनेक देश आहेत जिथे संयुक्तपणे राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना फारसे नातेवाईक नसतात. अशा देशांपैकी एका देशामध्ये चक्क भाड्याने म्हणजेच पैशांच्या मोबदल्यात नातेवाईक भाडे तत्वावर नियुक्त करता येतात. ही सेवा नेमकी काय आणि ती कशी काम करते जाणून घेऊयात...
कोणत्या देशात भाड्याने मिळतात नातेवाईक?
भाड्याने नातेवाईक मिळणारा हा देश आहे जगातील सर्वात वृद्ध लोकांचा देश म्हणजेच जपान! इथं नातेवाईक भाड्याने मिळण्याची व्यवस्था आहे. याला इंग्रजीमध्ये 'रेंटेड फॅमेली' किंवा 'रेंट-अ-फॅमेली' असं म्हणतात. इथे लोक व्यावसायिक अभिनेते अथवा अभिनेत्री भाड्याने घेऊन त्यांना आपले आई-वडील, भाऊ-बहीण, नवरा-बायको, मुलगा-मुलगी किंवा मित्र म्हणून मिरवतात.
या अशा सेवेची गरज काय?
'रेंटेड फॅमेली' हे वाचायला विचित्र वाटत असलं तरी या अशा सेवेचा जन्म येथील गरजेतून निर्माण झालाय. वयस्कर लोकांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानमध्ये 'रेंटेड फॅमेली' हा एकटेपणा, कुटुंब व्यवस्थेतील बदल, कमी जन्मदरावरील उपाय म्हणून पाहिला जातो. येथील लोकांचे जीवन कामामुळे फार व्यस्त असते. त्यामुळेच येथील बहुमतांशी लोकांना खरे नातेवाईक आणि त्यामधील आपुलकी मिळत नाही. जपानमधील सामाजिक स्थिती अशी आहे की येथे सामाजिक दबावही मोठा महत्त्वाचा विषय आहे. लग्न, नोकरी, अंत्यसंस्कार किंवा कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये 'परिपूर्ण कुटुंब' असल्याचं दाखवण्याच्या दबाव असतो. त्यामुळे लोक भाड्याने नातेवाईक घेतात.
जपानमध्ये एकटे राहणाऱ्या वृद्धांना मुलांची साथ हवी असते. लग्नात किंवा कार्यक्रमात कुटुंबातील सदस्य नसतात तर बाहेरचे लोक भाड्याने आणतात. नोकरी किंवा व्यवसायात 'स्थिर कुटुंब' असल्याचे दाखवायचे असते म्हणूनही अशापद्धतीने 'रेंटेड फॅमेली'संदर्भातील करार होतात. काही लोक फक्त संवादासाठी किंवा एकटेपणा कमी करण्यासाठी ही सेवा वापरतात.
ही पद्धत कशी काम करते?
भाड्याने नातेवाईक पुरवणाऱ्या कंपनीकडे अभिनेत्यांची म्हणजेच नातेवाईक म्हणून वागणाऱ्यांची अर्थात सेवा देणाऱ्यांची यादी असते. ग्राहक कंपनीला सांगतो की त्याला कोणत्या भूमिकेतील नातेवाईक हवा आहे. यामध्ये वडील, बहीण, पत्नी, आई हे असे आणि इतर अनेक पर्याय असतात. तसेच या भूमिकेतील नातेवाईक किती वेळ आणि कुठे हवा आहे याची माहिती ग्राहकाकडून दिल्यानंतर त्या ठिकाणी कंपनी योग्य ती व्यक्ती पाठवते. कंपनीकडून पाठवण्यात आलेले हे 'रेंटेड फॅमेली' मेंबर्स ग्राहकांना फार आधीपासून ओळखत असल्यासारखे इतरांसमोर त्यांच्याशी वागतात. त्यांचं वागणं फार नैसर्गिक असतं. त्यामुळे समोरच्यांना हे खरे नातेवाईक नाहीत याचा संशय येत नाही.
अशा सेवा देणाऱ्या कंपन्या कोणत्या?
जपानमध्ये अशी सेवा पुरवणाऱ्या सर्वात प्रसिद्ध कंपन्यांमध्ये फॅमेली रोमान्स ही कंपनी अग्रस्थानी आहे. याशिवाय हागीमाशी-थाई (Hagemashi-tai) वर इतर अनेक छोट्या-मोठ्या एजन्सीप्रमाणे काम करणाऱ्या सुमारे 300 कंपन्या देशभर आहेत. ही सेवा 1990 च्या दशकात सुरू झाली आणि आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या विषयावर 'रेंटल फॅमेली' नावाचा चित्रपटही आला आहे.
किती भाडं घेतात?
भाड्याने आलेले हे नातेवाईक तासाचे 5 ते 20 हजार येन म्हणजेच सुमारे 2800 ते 11 हजार रुपये इतके मानधन आकारतात. संपूर्ण कुटुंब भाड्यावर हवं असेल किंवा दीर्घ कालावधीसाठी एखाद्या भूमिकेतील नातेवाईक हवा असेल जास्त पैसे लागतात. काही वेळा फोटो काढणे, कार्यक्रमाला उपस्थित राहणे किंवा दीर्घकाळ साथ देणे यासाठी वेगळे दर असतात. हे दर कंपनी ठरवते. मात्र या नातेवाईकांनी कसं वागावं, काय काय करावं आणि काय नाही यासंदर्भातील सर्व नियम कंपन्यांकडे लिखित स्वरुपात असतात. ग्राहक आणि कंपन्यांमध्ये एकमत झाल्यानंतरच करार आणि भाडं निश्चित केलं जातं.