जुन्या तांब्याच्या तारा अन् एक चूक, अमेरिकेतील एअर शटडाउनचे कारण समोर, 50 अब्ज डॉलरचा खर्च येणार
अमेरिकेत दूरसंचार यंत्रणेत तात्पुरता बिघाड झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व विमान उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली होती.
9/11 नंतर पहिल्यांदाच अमेरिकेत सगळ्यात मोठा एअर शटडाउन जाहीर करण्यात आला होता. अमेरिकेत दूरसंचार यंत्रणेत तात्पुरता बिघाड झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व विमान उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली होती. आता नेमकं काय घडलं हे समोर आलं आहे?
11 सप्टेंबर 2011 च्या हल्ल्यांनंतर 14 नोव्हेंबर रोजी झालेली ही तिसरी देशव्यापी उड्डाणबंदी होती. यापूर्वी अशीच घटना जानेवारी 2023मध्ये घडली होती, जेव्हा एफएएने दोन तासांपेक्षा कमी कालावधीसाठी सर्व देशांतर्गत उड्डाणे थांबवली होती. मात्र शुक्रवारी जाहीर करण्यात आलेली हवाई आणीबाणी मोठ्या स्वरुपाची होती.
दोन दिवसांमध्ये 15 हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द करावी लागली होती. एअर ट्र्रॅफिक कंट्रोलच्या संपर्क यंत्रणेत बिघाड झाल्याने ही स्थिती निर्माण झाली होती. यामागचे कारण अखेर समोर आले आहे. तांब्याच्या तारा बदलताना संपूर्ण यंत्रणा कोलमडल्याने ही स्थिती उद्भवली होती. या एअर शटडाउनमुळं 15 ते 20 लाख प्रवाशांना याचा फटका बसला होता.
नेमकं घडलं काय?
अमेरिकेचे परिवहन मंत्री सीन डफी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर ट्रॅफिक कंट्रोल यंत्रणा सुधारण्यासाठी जुन्या तांब्याच्या तारांना बदलून फायबर केबल्स बदलण्यात येत आहेत. हे काम सुरू असताना नवीन राऊटर बदलताना चूक झाली आणि संपूर्ण संपर्क यंत्रणा ठप्प झाली. आता राऊटरच खराब होता की बदलताना चूक झाली, याचा शोध यंत्रणांकडून घेण्यात येत आहे.
हवाई वाहतूक सुरू झाली आहे. मात्र वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागू शकतो. एअर ट्रॅफिक यंत्रणा सुधारण्यासाठी 50 अब्ज डॉलर एवढा निधी लागणार आहे, असं अमेरिकेतील हवाई वाहतूक प्राधिकरणाचे प्रमुख ब्रायन बेडफोर्ड यांनी सांगितले आहे.
विमानसेवा विस्कळीत झाल्यानंतर तब्बल चार तासांहून अधिक काळ देशव्यापी उड्डाणे थांबवावी लागली होती. या घटनेमुळं शनिवारी दोन हजारांहून अधिक उड्डाणे रद्द झाली. तर शेकडो उड्डाणांना विलंब झाला होता. गेल्या 25 वर्षांतील हा सर्वाधिक काळ चाललेला एअर शटडाऊन होता. विमानसेवा कोलमडल्याने अनेक विमानतळावर मोठ्या प्रमाणात प्रवासी अडकले होते.