सणासुदीचे दिवस जवळ आले की घराची स्वच्छता आणि सजावट करण्याची लगबग सुरू होते. प्रत्येकाला आपलं घर आकर्षक, प्रसन्न आणि पाहुण्यांचं लक्ष वेधून घेणारं असावं असं वाटतं. मात्र, घर सजवण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो, असं नाही. थोडी कल्पकता आणि घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंचा योग्य वापर केला, तरी घराला अगदी नवा लुक देता येतो. फेस्टिव्ह सीझनआधी तुम्हीही घराचा मेकओव्हर करण्याचा विचार करत असाल, तर या सोप्या आणि बजेट-फ्रेंडली Home Decor Tips नक्की ट्राय करा.
फेरी लाइट्सने घर उजळवा
घर सजवण्यासाठी महागडे झुंबर किंवा लाइटिंग खरेदी करण्याची गरज नाही. बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या फेरी लाइट्सच्या मदतीनेही घराला सुंदर आणि आकर्षक लुक देता येतो. घरात असलेल्या जुन्या काचेच्या बाटल्या किंवा जार स्वच्छ करून त्यामध्ये फेरी लाइट्स ठेवा. हे जार लिव्हिंग रूमच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये ठेवले, तर वातावरणात सुंदर प्रकाश निर्माण होईल. तसंच, एखाद्या रुंद काचेच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि फ्लोटिंग दिवे ठेवू शकता. कमी खर्चात घराला एलिगंट आणि फेस्टिव्ह टच देण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.
ताज्या फुलांनी सजवा घर
फेस्टिव्ह डेकोरेशनमध्ये ताज्या फुलांचं महत्त्व वेगळंच आहे. झेंडूची फुलं आणि आंब्याच्या पानांचा वापर केल्याने घरात पारंपरिक वातावरण निर्माण होतं आणि ताजेपणाही जाणवतो. झेंडूच्या फुलांच्या माळा तयार करून त्या मुख्य दरवाजाला, खिडक्यांना किंवा जिन्याच्या कठड्याला लावू शकता. महागड्या डोअर डेकोरेशनऐवजी मुख्य प्रवेशद्वाराजवळ फुलं आणि पणत्यांच्या मदतीने आकर्षक रांगोळी तयार करा.
जुन्या वस्तूंना द्या नवा अवतार
घरातील काही जुन्या किंवा वापरात नसलेल्या वस्तू थोड्या कल्पकतेने सजावटीच्या वस्तूंमध्ये बदलता येतात. जुने मातीचे मडके किंवा कुंड्या फेकून देण्याऐवजी त्यांना आकर्षक रंगांनी रंगवा. त्यावर छोटे आरसे, गोटा किंवा लेस लावून त्यांना फेस्टिव्ह लुक देता येईल. घरात जुन्या रंगीत काचेच्या बांगड्या असतील, तर त्यांचाही क्रिएटिव्ह पद्धतीने वापर करता येतो. बांगड्या एकावर एक चिकटवून त्यापासून सुंदर कँडल स्टँड तयार करा. हा हटके देसी डेकोर पाहुण्यांचं लक्ष नक्की वेधून घेईल.
रंगीत कुशन आणि जुन्या साड्यांचा करा वापर
घराचा लुक बदलण्यासाठी दरवर्षी नवीन फर्निचर किंवा घराचा रंग बदलण्याची आवश्यकता नाही. फक्त कुशन कव्हर्स आणि पडद्यांचे रंग बदलले, तरी खोलीचा संपूर्ण लुक बदलू शकतो. सणासुदीच्या वातावरणासाठी लाल, पिवळा, हिरवा किंवा राणी रंगासारखे ब्राइट शेड्स निवडा. यामुळे घरात उत्साहपूर्ण वातावरण तयार होईल. तुमच्या कपाटात एखादी जुनी बनारसी किंवा सिल्कची साडी वापरात नसेल, तर तिचा उपयोग सेंटर टेबल कव्हर किंवा सोफा थ्रो म्हणून करू शकता. यामुळे घराला पारंपरिक आणि रॉयल लुक मिळेल.
फर्निचरची मांडणी बदला
घराला नवा लुक देण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन वस्तू खरेदी करण्याची गरज नसते. अनेकदा फक्त फर्निचरची मांडणी बदलली तरी घराचा संपूर्ण लुक बदलतो. फेस्टिव्ह सीझनच्या साफसफाईदरम्यान अनावश्यक वस्तू बाजूला काढा आणि सोफा, खुर्च्या किंवा टेबलची जागा बदलून पाहा. सोफ्याची दिशा किंवा कोन बदलल्याने खोली अधिक मोकळी आणि प्रशस्त दिसू शकते. स्वच्छ आणि नीटनेटका घराचा लुक स्वतःच आकर्षक दिसतो. अशा वातावरणात एखादी साधी पणती किंवा दिवाही घराची शोभा वाढवतो.
घरात हिरवाई वाढवा
घरात आधीपासून इनडोअर प्लांट्स किंवा कुंड्यांमधील रोपं असतील, तर त्यांचा सजावटीसाठी योग्य वापर करा. ड्रॉइंग रूमच्या कोपऱ्यात किंवा खिडकीजवळ ही रोपं व्यवस्थित मांडता येतील. रोपांच्या आसपास हलक्या फेरी लाइट्स लावल्यास त्यांना आणखी आकर्षक लुक मिळतो. हिरवाई आणि मंद प्रकाश यांचा सुंदर मिलाफ घरात प्रसन्न, शांत आणि उबदार वातावरण तयार करतो.
कमी खर्चात घराला द्या फेस्टिव्ह लुक
घराची सजावट करण्यासाठी नेहमी महागड्या वस्तूंची आवश्यकता नसते. घरात उपलब्ध असलेल्या जुन्या वस्तूंचा क्रिएटिव्ह वापर, थोडी रंगसंगती, फुलं, दिवे आणि योग्य मांडणी यांच्या मदतीनेही घराचा लुक पूर्णपणे बदलता येतो.
त्यामुळे या फेस्टिव्ह सीझनला बजेटची चिंता न करता तुमच्या क्रिएटिव्हिटीला वाव द्या आणि घराला सुंदर, प्रसन्न आणि फेस्टिव्ह लुक द्या.