स्मार्टफोन वापरताना वारंवार बॅटरी चार्ज करण्याचा कंटाळा येतो? मग विवोने सादर केलेला नवा वाय32 5G फोन चर्चेत आहे. या फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 8000एमएएच क्षमतेची बॅटरी. त्यासोबत 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि पाणी-धुळीपासून संरक्षणासाठी आयपी68 व आयपी69 रेटिंग देण्यात आली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
विवो Y32 5G मध्ये 8000 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. त्यामुळे जास्त वेळ व्हिडीओ पाहणारे, सोशल मीडिया वापरणारे किंवा प्रवासात फोनचा वापर करणाऱ्यांसाठी हा पर्याय आकर्षक ठरू शकतो. फोनमध्ये 44 वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. याशिवाय 7.5 वॅट रिव्हर्स चार्जिंगची सुविधाही मिळते. कंपनीच्या दाव्यानुसार, 1500 चार्जिंग सायकलनंतरही बॅटरीची क्षमता 80 टक्क्यांपेक्षा जास्त टिकू शकते.
या स्मार्टफोनमध्ये 6.87 इंचांचा LCD डिस्प्ले आहे. त्याचे रिझोल्यूशन 1592 × 720 पिक्सेल असून 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. बाहेरच्या प्रकाशात स्क्रीन स्पष्ट दिसण्यासाठी १,३०० निट्सपर्यंत ब्राइटनेसचा दावा आहे. TÜV Rheinland चे लो ब्लू लाइट प्रमाणपत्रही डिस्प्लेला मिळाले आहे.
फोनमध्ये ४एनएम तंत्रज्ञानावर आधारित क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबत ६GB LPDDR4X रॅम आणि १२८GB UFS 2.2 स्टोरेजची कॉन्फिगरेशन अधिकृत यादीत दिसते. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज २टीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफीसाठी मागील बाजूस ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा अतिरिक्त सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
विवो Y32 5G ला IP68 आणि IP69 रेटिंग देण्यात आली आहे. याशिवाय MIL-STD-810H मानक आणि SGS फाइव्ह-स्टार ड्रॉप रेझिस्टन्स प्रमाणपत्राचाही उल्लेख आहे. फोन अँड्रॉइड 16 आधारित ऑरीजीन ओएस 6 वर चालतो. स्टीरिओ स्पीकर्स, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, एनएफसी, वायफाय 5 आणि ब्लूटूथ 5.1 यांसारखी वैशिष्ट्येही आहेत.
विवोने Y32 5G ची अधिकृत यादी काही बाजारपेठांमध्ये प्रसिद्ध केली आहे. डॉन गोल्ड आणि मिडनाईट ब्लॅक अशा रंगांमध्ये हा फोन उपलब्ध होणार आहे. मात्र, कंपनीने अधिकृत किंमत आणि विक्रीची तारीख जाहीर केलेली नाही. भारतात लॉन्च होण्याबाबतही स्पष्ट घोषणा झालेली नाही. असे असले तरी परवडणाऱ्या किंमतीतला हा फोन असेल सांगितले जात आहे.